वरिष्ठांचे दुर्लक्ष : वाहन गेल्यास पडतात खड्डे; लक्ष देण्याची मागणी नवरगाव : नवरगावातील रत्नापूर फाटा ते आझाद चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर फेवरब्लॉक लावणे सुरू असून त्यावरून एखादे चारचाकी वाहन गेल्यास फेवरब्लॉक जमिनीत दबत असल्याने रस्त्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिंदेवाही-नेरी रस्त्यावरील रत्नापूर फाट्यावरून नवरगावात येण्याचा मुख्य मार्ग असून या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण होत होते. त्यामुळे या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकादारांना आणि प्रवाशांना दरवर्षी त्रास होत होता. याला कंटाळून वारंवार जिल्हा परिषदेला याबाबत लेखी निवेदन दिले. तरीही याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे कंटाळून जिल्हा परिषदेच्या या रस्त्यावर मागील वर्षी चक्क चिखल करून धानाची रोवणी करून संबंधित विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूरकडून जिल्हा वार्षिक उपाययोजनेतंर्गत या रस्त्याच्या बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. फेब्रुवारी-मार्चमध्ये या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाला सुरूवात झाली. २५-२६ फुट रूंद रस्त्याचे काँक्रीटकरण करण्यात आले तर उर्वरित रस्त्याच्या दुतर्फा फेवरब्लॉक लावण्याचे ठरविले. उर्वरित दोन्ही बाजुला दोन मीटर रूंद फेवरब्लॉक लावण्याचे काम सुरू असून त्याचा खालचा भाग सिमेंट काँक्रीट टाकून मजबूत करणे व त्यावर फेवरब्लॉक लावणे अपेक्षित असताना जमिनीवर थोडीथोडी गिट्टी व रेती पसरवून रेतीवरच फेवरब्लॉक लावणे सुरू आहे.वास्तविक, नवरगावात याच रस्त्याने दिवसातून शेकडो वाहने गावात येत असतात. (वार्ताहर)
मातीवरच लावले जात आहे फेवरब्लॉक
By admin | Published: April 23, 2017 1:02 AM