विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे नेतृत्व : मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधलेचंद्रपूर : पायली, भटाळी, किटाळी, सिनाळा, मसाळा, नवेगाव, तिरवंजा येथील कोळसा खाणीकरिता वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र प्रकल्पग्रस्तांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. प्रकल्पग्रस्तांचा दीडशे कोटीहून अधिक मोबदला अडवून ठेवला, विस्थापित सर्वसामान्यांचे सानुग्रह अनुदानही दिले नाही. वेकोलिच्या या धोरणाविरोधात आज शनिवारी येथील गांधी चौकात धरणे देण्यात आले. त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.पायली, भटाळी, किटाळी, सिनाळा, मसाळा, नवेगाव, तिरवंजा व इतर कोळसा खाणीकरिता वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी आठ वर्षांपासून संपादित केल्या आहेत. वेकोलिने संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला वेळेत देणे बंधनकारक आहे. वेकोलिने १८ महिन्यांपूर्वी व ११ महिन्यांपूर्वी मोबदल्याची रक्कम प्रकल्पग्रस्तांना एकमुस्त देण्याबाबत करारनामे केले आहेत. असे असतानाही वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात टाळाटाळ करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी वारंवार वेकोलिच्या अधिकाऱ्यांना भेटून मोबदला, नोकरी व इतर मिळणारा लाभ देण्याची विनंती केली. मात्र वेकोलि प्रशासन आपली मनमानी करीत आहेत. वेकोलिने एकतर करारनामा रद्द करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्तांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा, या मागणीसाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी ११ वाजतापासून गांधी चौकात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे साडेतीन हजार प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.अन्यथा प्रकल्पग्रस्त खाणीत मुक्काम करतील-पुगलियावेकोलि प्रशासन प्रकल्पग्रस्तांची थट्टा उडवित आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्याशी जीवघेणा खेळ वेकोलिने मांडला आहे. आठ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून अद्याप मोबदला दिला नाही. या खाणीमुळे विस्थापित झालेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही सानुग्रह अनुदान दिले नाही. वेकोलिने आपली मनमानी सोडून प्रकल्पग्रस्तांना तात्काळ मोबदला द्यावा अन्यथा करारनामाच रद्द करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्त आपल्या कुटुंबासह खाणीत राहायला जातील, असा इशारा माजी खासदार तथा विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी पुगलिया म्हणाले, वेकोलि पायली, भटाळी, किटाळी, सिनाळा आदी ठिकाणी कोळसा खाणीकरिता २००८ मध्ये जमिनी संपादित केल्या. या अठराशे एकर शेतजमिनीचा आर्थिक मोबदला दीडशे कोटीहून जास्त आहे. या दीडशे कोटींचा व्याज दरमहिन्याला सव्वा दोन कोटी येतो. आठ वर्षांपासून या मोबदल्याचा व्याज वेकोलि आपल्याकडे ठेवत आहे आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहे. २०१२ च्या शासकीय निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळाला पाहिजे. याशिवाय ज्यांच्या जमिनी नाही, तेदेखील या प्रक्रियेत विस्थापित झाले आहेत. शेतमजूरही बेरोजगार झाले आहेत. त्यांनाही वेकोलिने प्रत्येकी तीन लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशीही मागणी पुगलिया यांनी केली. वेकोलिने या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास प्रकल्पग्रस कुटुंबासह व खाण्यापिण्याच्या साहित्यासह खाणीत बसून आंदोलन करतील, असा इशाराही पुगलिया यांनी दिला.
वेकोलिच्या धोरणाविरोधात धरणे
By admin | Published: January 31, 2016 12:51 AM