फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्ट्रागाम आदी सोशल साइटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना नवनवीन मित्र बनविण्याचे जनू फॅडच जडले आहे. मात्र यातून अनेकांची फसवणूक होत आहे. कोरोना काळात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला होता. लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांना पैशांची चणचण भासत होती. त्यात एकमेकांना भेटता येत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद सुरू होता. त्याचा हॅकर्सनी फायदा उचलला. बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून संवाद साधला. मैत्री केली. त्यानंतर खात्यावर पैसे पाठविण्यास सांगायचे. अशा प्रकारे ही फसवणूक करण्यात येत होती. जिल्ह्यात असे अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट आल्यास तपासूनच स्वीकारावी तसेच फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
बॉक्स
तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर...
सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यात बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून पैशाची मागणी केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा तक्रारीमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे बहुतेक जण तक्रार करण्यासही मागे-पुढे पाहतात.
फेसबुक अकाऊंट वापणाऱ्यांनी त्याच्या पोस्ट केवळ मित्रांनाच दिसतील अशा पद्धतीची सेटिंग करावी. सेटिंगमधील ऑल या ऑप्शनऐवजी ओन्ली फ्रेंड हे ऑप्शन सिलेक्ट करावे.
फेसबुकचा वापर करीत असताना एखाद्या मित्राकडून पैशाची मागणी होत असेल तर मोबाईलवरून खात्री करून त्यानंतरच मदत करावी.
फेसबुक अकाऊंट बनावट आहे, असा संशय आल्यानंतर या संदर्भात थेट स्थानिक पोलीस किंवा सायबर शाखेकडे रितसर तक्रार दाखल करावी.
बॉक्स
तक्रारीनंतर सायबर पोलीस घेतात शोध
सोशल मीडियावर अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर सेलच्या माध्यमातून ई-मेल आयडी व इतर माहिती घेऊन संबंधित व्यक्तीचा पासवर्ड परत मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यानंतर तो पासवर्ड फॉरमेट करण्यात येतो.
फसवणुकीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर पोलीस त्यांचा छडा लावत असतात. त्यासाठी सायबरमधील तज्ज्ञ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असते.
बॉक्स
फेसबुकला पाठविला जातो मेल
फेसबुक अकाऊंटवर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल करावी लागते. पोलीस प्रशासनातील सायबर सेलकडे ही तक्रार आल्यास सेलच्या माध्यमातून त्या आयडीचा स्क्रिन शॉट काढून फेसबुकला रितसर ई-मेल व अर्ज पाठवून फेसबुक अकाऊंट बंद केले जाते. तक्रार केल्यानंतर काही दिवसात तो अकाऊंट बंद करण्यात येते.
बॉक्स
कोरोना काळात वाढल्या तक्रारी
दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सर्व बंद असल्याने सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. ही बाब हेरून अनेकांनी फेक अकाऊंट बनवून लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून मदत मागितली. अनेकांनी कुठलीही तपासणी न करता मदत केली. नंतर त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तर बहुतेकांशी सोशल मीडियावर बनविलेल्या फ्रेंडने व्हिडिओ कॉल करून संबंधितास अश्लील छायाचित्रे दाखवत संबंधिताची फसवणूक केल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.