लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बा. : बनावट सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या एका छोटेखानी कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकला. यात २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, आठजणांना अटक करण्यात आली आहे.मुख्य आरोपी सलमान आरिफभाई कासवानी (२७, रा. आरमोरी, जि. गडचिरोली) यांच्यासह सागर तेजराम सतीमेश्राम (३३, रा. खंडाळा तह. साकोली, जि. भंडारा), रोहित माणिक धारणे (२२, रा. गोगाव, ता. ब्रह्मपुरी), वैभव प्रभाकर करकाडे (२४), रा. ब्रह्मपुरी, सागर संजय गजभिये (२४, रा. सांगिडी, ता. साकोली), वैभव भास्कर भोयर (२२, रा. भगतसिंग चौक, आरमोरी), मयूर सुरेश चाचरे (२७, रा. सांगिडी, ता. साकोली, खेमराज विलास चटारे (२०, रा. आरमोरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.तळोधी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा वलनी गावापासून पूर्वेस अर्धा कि.मी अंतरावर असलेल्या सचिन वैद्य (रा. तळोधी बा.) यांच्या फार्महाऊसवर सलमान आरिफभाई कासवानी (रा. आरमोरी) हा मजा, ईगल व हुक्का अशा कंपन्यांचे सुगंधित तंबाखू आणून, ते मशीनच्या साहाय्याने भेसळ करून अवैधरीत्या विकत होता. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे व पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांनी दोन पथके तयार करून (तळोधी बा.) येथील सचिन वैद्य यांच्या फार्महाऊसवर धाड टाकली. तिथे २५ ते ३० वयोगटातील मुलांना सोबत घेऊन आरमोरी येथील सलमान आरिफभाई कासवानी हा सुगंधित तंबाखू मशीनच्या साहाय्याने भेसळ करताना दिसून आले. यावेळी एक हजार किलो सुगंधित तंबाखू, वेगवेगळ्या मशीन, वजनकाटा, सीलिंग मशीन, बारकोड मशीन, लाकडी मशीन, मिक्सर मशीन व इतर साहित्य असा एकूण २५ लाख ७१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, सहायक फौजदार राजेंद्र खनके, संजय आतकुलवार, सुरेंद्र महंतो, गणेश मोहुर्लै, संतोष येलपुलवार, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, गणेश भोयर, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, आदींनी केली.