कापूस उत्पादकांत चिंता : पेरा वाढला मात्र पीक हाती येईल काय?चिमूर : झाडीपट्टी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चिमूर तालुक्यात मागील काही वर्षापासून धानाची लागवड कमी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सीजनमध्ये जुलै महिन्यापासून पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी जोमात असले तरी कापूस उत्पादन शेतकरी कोमात जाण्याच्या स्थितीत आहेत. गत दोन वर्षापासून निसर्गाने साथ न दिल्यने सोयाबीन शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे तालुक्यात सोयाबीन पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. मात्र धान उत्पादकांच्या संख्येत कोणताच परिणाम झाला नाही. आजही तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतल्या जात आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीनने शेतकऱ्यांना दगा दिल्याने आता भिसी, शंकरपूर, मासळ, जांभुळघाट, खडसंगी, बोथली, वहानगाव, आमडी, रेगाबोंडी, साठगाव, आंबेनेरी, मोठेगाव या धानाच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे.सध्या कापसाला फुल, पात्या, लागण्याला सुरुवात झाली आहे. कापसाचे पीक हातात येण्यास काही कालावधी उरला आहे. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून आकाशात काळे ढग दाटून येत असल्याने कापूस शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर मागील दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने तालुक्यातील काही भागात हजेरी लावली आहे. यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने सद्यातरी शेतकरी समाधानी आहे. मात्र निसर्गाने दगा दिल्यास शेतकऱ्याच्या हातात आलेले कापसाचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)बस्... आता पाऊस नको !नागभीड : नागभीड तालुक्यात जे धान पीक घेतल्या जाते, त्यासाठी आतापर्यंत पडलेले पाऊस पुरेसे आहे. आणखी पाऊस लांबला तर तो हलक्या धानासाठी घातक ठरण्याची भिती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. नागभीड तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २६ ते २७ हजार क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. यात हलके आणि भारी या दोन्ही धानाच्या जातीचा समावेश आहे. हलके धान साधरणत: ९० दिवसाचे तर भारी धान जवळपास १२० दिवसाचे असतात. सद्यस्थितीत हलके धानाचा ‘निसवा’ सुरू झाला आहे. त्यामुळे या धानाला आता पावसाची गरज नाही आणि भारी धानाच्या बाबतीत म्हटले तर यापुढे पाऊसच पडला नाही तरी या धानाला फटका बसण्याची शक्यता नाही. मात्र या पुढे पाऊस लांबला तर तो हलक्या धानासाठी घातक ठरणार आहे. एकंदर आतापर्यंत पडलेला पाऊस या तालुक्यातील धान पिकासाठी पुरेसा आहे.
परतीच्या पावसाने धान जोमात तर कापूस कोमात
By admin | Published: September 26, 2016 1:09 AM