वाहतूक पोलिसांचे निर्देश पायदळी : १० आॅटोचालकांवर दंडात्मक कारवाईचंद्रपूर: वाहतूक पोलिसांनी निर्देश देऊनही नियमांचे पालन न करणाऱ्या आॅटो चालकांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी नियम मोडणाऱ्या १० आॅटोचालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतुकदारांकडून वाहतुकीचे नियम पाळले जावेत, पर्यायाने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतुने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी २२ नोव्हेंबरला शहरातील आॅटो चालक-मालक संघटनेची बैठक आयोजित केली होती. त्यात १ नोव्हेंबरपासून सर्व आॅटोचालकांनी खाकी गणवेश परिधान करूनच आॅटो चालवावा, तसेच परिवहन विभागाकडून देण्यात आलेले बिल्ले सोबत बाळगावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले होते. आॅटोचालकांकडून निर्देशाचे पालन होत आहे की नाही, याबाबत सोमवारी व मंगळवारी वाहतूक पोलिसांनी तपासणी मोहिम सुरू केली. यात अनेक आॅटोचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.मंगळवारी अशा १० आॅटो चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे काही आॅटोचालकांनी वाहतूक पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले तर काही आॅटोचालकांनी याला विरोध केला आहे. (प्रतिनिधी)संघटनेचे अध्यक्ष म्हणतात...यासंदर्भा महाराष्ट्र आॅटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खांडरे यांना विचारणा केली असता, शहरातील आॅटो चालक वाहतूक पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. यापूर्वीदेखील जिल्हा पोलीस अधीक्षक तथा वाहतूक पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करण्यात आले आहे. मात्र आॅटोचालकांच्याही काही वैयक्तिक समस्या असतात, परिणामी वारंवार आॅटोचालकांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागतो. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी सर्व आॅटो चालकांना खाकी पोशाख व बिल्ला लावण्याची सक्ती केली आहे. चंद्रपूर शहरात जवळपास पाच हजारपेक्षा अधिक आॅटोचालक आहेत. अनेक चालकांजवळ परिवहन विभागाचे बिल्ले नाहीत. विशेष म्हणजे संबंधित चालकांनी बिल्ला मिळविण्यासाठी शुल्काचा भरणादेखील केला आहे. पण परिवहन कार्यालयातच बिल्ले उपलब्ध नाहीत. मग आॅटो चालकांनी काय करावे, असा सवाल खांडेकर यांनी उपस्थित केला. आॅटो चालकांचा ९ डिसेंबरला महामोर्चामहाराष्ट्र आॅटो रिक्षा चालक-मालक पंचायत तथा विदर्भ आॅटोरिक्षा चालक-मालक फेडरेशनच्यावतीने राज्यातील आॅटोरिक्षा, टाटा मॅजीक, मिनीडोअर, पीक-अप, काळीपिवळी, टाटा एस चालकांचा येत्या ९ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर महामोर्चा धडकणार आहे. आॅटोरिक्षा चालकांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ गठित करण्यात यावे, विधानपरिषगेत आॅटोरिक्षा चालकांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात यावी, परवाना किंवा आॅटोसंबंधी कोणताही नियम तयार करताना संघटनेला विश्वासात घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
आॅटोचालकांविरुद्ध नियमांचा फास
By admin | Published: December 02, 2015 12:42 AM