राळापेठ येथील घटना : जादुटोण्याच्या संशयगोंडपिपरी : तालुक्यातील राळापेठ येथे ताप व डेंग्यु सदृश रोगाने थैमान घालून पाच जणांचा बळी घेतला. या गावातील दूषित पाणी पुरवठा, घनकचरा व सांडपाण्याने तुडूंब भरलेल्या नाल्या यामुळे त्यांचा बळी गेल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मात्र येथील नागरिकांचे समाधान झाले नाही. काही नागरिकांनी अंधश्रद्धेतून जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करीत एका कुटुंबास बेदम मारहाण केली. त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने अन्यायग्रस्त कुटुंबाने गाव सोडून पलायन केल्याची चर्चा आहे. मागील एक महिन्यापूर्वी राळापेठ येथे डेंग्यु सदृश व तापाने पाच जण दगावले. यानतंर रोग नियंत्रणासाठी विविध ठिकाणांहून आरोग्य अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र मृत्यू सत्र थांबविण्यात विलंब झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीसह आमदार सुभाष धोटे व खासदार हंसराज अहीर यांनी आरोग्य विभागास चांगलेच धारेवर धरले. एका पाठोपाठ सलग पाच जणांचा बळी गेल्याने धास्तावलेल्या राळापेठ वासियांना काय करावे, हे सुचत नव्हते. त्यानंतर येथील काही नागरिकांनी अंधश्रद्धेतून गावात जादूटोणा झाल्याचा संशय व्यक्त केला. बाहेरगावाहून मांत्रीकास पाचारण केले. राळापेठ येथील ग्रामस्थांच्या आग्रहावरून मांत्रीक गावात दाखल होताच त्याने पूजा अर्चनेसह प्रत्येक घरातून नैवद्य शिजवून आणण्यास सांगितल्याचे समजते. त्यापैकी केवळ पुरुषोत्तम सिडाम यांच्या घरुन नैवद्य आला नसल्याचे लक्षात येताच मांत्रीकाच्या सांगण्यानुसार गावकऱ्यांचा त्याच्यावर संशय बळावला आणि गावातील नागरिक व महिलांनी पुरुषोत्तम सिडाम याच्यासह त्याची पत्नी मुलास माराहाण केल्याचे समजते.या घटनेसंदर्भात राळापेठ येथील काही ग्रामस्थांना विचारले असता राळापेठ येथे घडलेल्या मृत्यूसत्रामागे सिडाम कुटुंबच कारणीभूत असून कुटुंबियांना चोप दिल्यानंतर सिडाम कुटुंबियांनी गावातून पलायन केल्याची माहिती मिळाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मारहाणीनंतर कुटुंबीयांचे पलायन
By admin | Published: June 25, 2014 11:41 PM