सास्ती (चंद्रपूर) : संततधार पावसाने वर्धा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने शेती पाण्याखाली गेली. मोठे नुकसान झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सतत चार वेळा पीक पाण्याखाली येऊन नुकसान झाल्याने चुनाळा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
रवींद्र नारायण मोंढे (४५, रा. चुनाळा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. त्यांनी सेवा सहकारी संस्था मर्यादित चुनाळा येथून शेतीकरिता ७० हजार रुपयांचे पीक कर्ज उचलले. त्यातून शेतात कपाशी व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. रवींद्र हा एकुलता एक मुलगा असल्याने घरच्या म्हाताऱ्या आई- वडिलांचा सांभाळ वर्षभर शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर करीत होता. मात्र या एक महिन्यात चार वेळा पुराच्या पाण्याखाली शेतपीक आल्यामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. त्यापूर्वीही दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागले.
अशातच रवींद्र यांच्या आईला विद्युत शॉक लागल्याने त्याही दवाखान्यात उपचार घेत होत्या. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने बँकेचे कर्ज आणि इतरांकडून हातउसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत असलेल्या रवींद्रने आपल्या राहत्या घरी कोणीच नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केली. जवळच्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर राजुरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.