चंद्रपूर : शेतात मिरची व मका पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकरी पितापुत्राला विद्युत शॉक लागला. यात पित्याचा मृत्यू झाला. तर मुलगा जखमी झाला. ही घटना सावली तालुक्यातील सोनापूर शिवारात सोमवारी ४:१५ वाजताच्या सुमारास घडली. तेजराव दादाजी भुरसे (वय ६२) असे मृत शेतकरी पित्याचे, तर दिनेश तेजराव भुरसे (वय ३२) असे जखमी पुत्राचे नाव आहे. त्याला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भुरसे यांनी आपल्या शेतात मिरची व मका पिकाची लागवड केली आहे. सोमवारी ते आपली पत्नी, मुलगा दिनेश याच्यासह शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास पाणी देत असताना त्यांचा विद्युत तारेला स्पर्श झाला. वडिलांना विद्युत शॉक लागल्याचे बघून मुलगा त्यांना सोडविण्यासाठी गेला. त्यालाही शॉक लागला. पती व मुलाला विद्युत शॉक लागत असल्याचे बघून पत्नीने आरडाओरड केली. यावेळी जवळील शेतातील शेतकरी आले. त्यांनी लगेच वीज बंद केली. दोघांनाही रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी पित्याला मृत घोषित केले. तर पुत्रावर प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविले. घटनेची माहिती सावली पोलिसांना मिळताच सावली पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक बन्सोड, पीएसआय चिचघरे यांच्यासह एएसआय पीतांबर खरकाटे, एनपीसी विशाल दुर्योधन घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.