- शंकर चव्हाण (जिवती, जि. चंद्रपूर)
पारंपरिक शेती करण्याचा कल आता बदलू लागला आहे. नवीन प्रयोग, नवीन पिके, फळभाजी यासारखे पर्याय प्रयोगशील शेतकऱ्यांना खुणावत आहेत. एका सिंमेट फाऊंडेशनच्या बीसीआय प्रकल्पाच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत एका शेतकऱ्याने चक्क पाच एकरांवर लावलेल्या कापूस पिकात कोबी आणि वाल या आंतरपिकाची लागवड करून लाखोंचे उत्पन्न काढले आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्याचा हा प्रयोग या तरुण शेतकऱ्याने यशस्वी केला असून, इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
जिवती तालुक्यातील पठारावर वसलेल्या हिमायतनगर येथील तरुण शेतकरी जमीर सय्यद यांनी पाच एकरावर कापूस पिकाची लागवड केली आहे. झाडांचे अंतर कमी करून झाडांची संख्या तर वाढवलीच; शिवाय त्याच कापूस पिकात आंतरपीक म्हणून कोबी आणि वाल या फळभाजीची लागवड केली. यामुळे ६० दिवसांत कोबीचे ८७ हजार रुपयांचे उत्पन्न, तर वालाचे १ लाख ६५ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. मागील दोन वर्षांपासून फाऊंडेशनने जिवती तालुक्यात २००४ पासून सुरू केलेल्या बीसीआय प्रकल्पातून वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व प्रशिक्षण याच भरवशावर सय्यद हे माळरानावर कापूस पिकासोबतच आंतरपिकातून विक्रमी उत्पादन घेत फायदेशीर शेती करण्याकडे वळले आहेत.
वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी जमीर सय्यद या तरुण शेतकऱ्यावर आली होती. अचानक झालेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो पूर्णत: खचला होता. शेतीचे ज्ञान नाही. कुटुंब कसे सांभाळायचे, हा प्रश्नही त्याच्या मनात घर करून बसला होता; परंतु गावातील अनुभवी शेतकऱ्यांची साथ घेतली आणि पारंपरिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. मात्र, निसर्गाची अवकृपाच की, पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नव्हते. त्यावर त्याचा खर्चही अधिक व्हायचा. उरलेल्या पैशातून घरखर्च सांभाळणेही कठीण झाले होते. पीक लागवडीपासून तर पीक हातात येईपर्यंत कर्ज काढूनच शेती करावी लागायची. कर्जातून यंदा तरी सुटका होईल असे वाटायचे; परंतु पावसाने ऐन वेळी दगा दिला की, मनात बाळगलेल्या स्वप्नांचा चुराडा व्हायचा.
अशातच जिवती तालुक्यात बीसीआय प्रकल्पाची सुरुवात करून येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले. या मार्गदर्शनाचा लाभ हिमायतनगरच्या जमीर सय्यद या तरुण शेतकऱ्याला झाला. सय्यद यांनी पारंपरिक पद्धतीने घेत असलेल्या कापूस पिकात बदल करून आंतरपिके घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. उत्पादन क्षेत्र वाढविले. यामध्ये त्याचा आर्थिक फायदा होऊ लागल्याने त्याने हिमायतनगर या पहाडी भागावर कमी दिवसांत हाती येणाऱ्या पिकाची लागवड करून अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. पिकाचे फेरपालट म्हणून एक वेगळा प्रयोग सय्यद यांनी केला. कापूस लागवड केली. यानंतर त्यांनी या पिकातच आंतरपीक घेणे सुरू केले.