लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा नियत क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाच्या हल्ल्यात सोमवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला. मृतकाचे नाव मारोती पेंदोर असे आहे. आतापर्यंत दहा लोकांचा बळी जावूनही हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खांबाडा येथील मारोती पेंदोर यांची गावाला लागूनच शेती आहे. सोमवारी दुपारी शेतीच्या जवळच असलेल्या कक्ष क्रमांक १७८ मध्ये पाळीव जनावरांना चराईसाठी नेले होते. परंतु सायंकाळी घरी परत आले नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबाने गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात शोधशोध सुरू केली असता वाघाच्या हल्ल्यात मारोती पेंदोर यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
वाघाने हल्ला केल्यानंतर त्यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग खाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर राजुऱ्याचे वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेतृत्वातील पथकाने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. तपासणीनंतर कुटुंबीयांना मृतदेह सुपुर्द करण्यात आला. ऐन शेतीच्या हंगामात अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.हल्लेखोर वाघाचा चार महिन्यांपासून धुमाकूळराजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हल्लेखोर वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. या कालावधीत वाघाने नऊ जणांचा बळी घेतला. सोमवारी खांबाडा येथील मारोती पेंदोर या शेतकऱ्याला ठार केल्याने परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीची जागली सोडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांवर वाघाचा हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठांना अहवालाद्वारे देण्यात आली आहे. हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यश आले नाही. त्यामुळे नागरिकांनी शेतीची कामे करताना काळजी घेतली पाहिजे.-विदेशकुमार गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा