आॅनलाईनचा फटका : एक वर्षापासून सुरू आहे प्रकारवतन लोणे घोडपेठसर्वसामान्य नागरिकांना कार्यालयीन कामकाजासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी शासनाने आॅनलाईन सातबारा देण्याची सुविधा निर्माण केली. मात्र घोडपेठ व परिसरातील शेतकऱ्यांचे सातबारे आॅनलाईन प्रक्रियेत अजूनपर्यंत अद्ययावत करण्यात आले नाहीत. त्यामुळे घोडपेठ येथील तलाठी कार्यालयातून तलाठ्याच्या सही व शिक्कयानिशी चुकीचे आॅनलाईन सातबारे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत.मागील वर्षापासून वरिष्ठांच्या आदेशानुसार तलाठी कार्यालयातून हस्तलिखीत सातबारे देणे बंद करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांची व खासकरून शेतकरी बांधवांची सातबाऱ्यासाठी होणारी ससेहोलपट थांबावी, हा यामागचा मुळ हेतू होता. तलाठ्याकडून हस्तलिखीत सातबारे देणे बंद झाले आहे. मात्र, घोडपेठ व परिसरातील शेतकरी बांधवांचे सातबारा रेकॉर्ड आॅनलाईन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यास प्रशासनाला विसर पडल्याचे दिसत आहे.तलाठी कार्यालयात सातबारा मागण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना आॅनलाईन सातबारा काढण्यास सांगितल्या जात आहे. मात्र आॅनलाईन प्रणालीच अद्ययावत न झाल्यामुळे घोडपेठ व परिसरातील शेतकऱ्यांना महत्वाच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या "महाभूलेख" या संकेतस्थळावरील दोन वर्षांपूर्वीचा आॅनलाईन सातबारा काढून काम चालवावे लागत आहे.आश्चर्याची बाब म्हणजे या सातबाऱ्यावर कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही, अशी स्पष्ट सूचना लिहिलेली असतानाही घोडपेठ येथील तलाठी यांच्याकडून स्वत:ची सही व शिक्का मारून हा सातबारा संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. घोडपेठ व परिसरातील शेतकरी बांधवांचे सातबारे आॅनलाईन प्रणालीमध्ये लवकरात लवकर अद्ययावत करण्यात यावेत. तोपर्यंत शेतकऱ्यांना हस्तलिखीत सातबारा देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.महत्त्वाचे दस्ताऐवज जीर्ण अवस्थेतजमीनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही गांव नमुना क्र. १ ते २१ या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील ७ नंबरचा नमुना मालकी हक्काबाबतचा आहे तर १२ नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून ७/१२ चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला. सातबारा हा जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. मात्र घोडपेठ येथील तलाठी कार्यालयातील हे महत्वाचे दस्तावेज अतिशय जिर्ण व फाटलेल्या अवस्थेत आहेत. या दस्तावेजांत एका शेतकऱ्याचा सातबारा सापडला नाही म्हणून तुमची येथे जमीनच नाही, असे सांगून त्या शेतकऱ्याला चारदा परत पाठविण्यात आले होते. "लोकमत" प्रतिनिधीने घोडपेठ येथील तलाठी कार्यालयास भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला.
शेतकऱ्यांना मिळत आहे चुकीचा सातबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2017 12:25 AM