लोकप्रतिनिधींकडून दिशाभूल : रस्त्याचे काम अद्यापही प्रस्तावितचनांदाफाटा : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झालेल्या कोरपना तालुक्यातील भोयेगाव- गडचांदूर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ८५ कोटी रूपये मंजूर केल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. मात्र सदर रस्त्याची मागणी कागदोपत्रीच प्रस्तावित असून अजूनही या रस्त्याला निधी अभावी तांत्रिक मान्यता मिळाली नाही. त्यामुळे शुक्रवारी शेतकरी संघटनेने रोष व्यक्त करीत रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव दिवे, समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, पं.स. सभापती रवी गोखरे, माजी जि.प. सदस्य अशोक मुसळे, तालुकाध्यक्ष मारोती काकडे, पोर्णिमा निरंजने, माजी उपसभापती मदन सातपुते, गणपत काळे, शांताराम पानघाटे, परशुराम गोखरे आदी उपस्थित होते. भोयेगाव रस्त्याच्या मंजुरीबाबत खुलासा करताना चटप यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे पत्र आंदोलकांना वाचून दाखविले. यावेळी उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, ठाणेदार विनोद रोकडे आदी उपस्थित होते. अॅड. चटप यांनी माण्यांचे निवेदन एसडीओंना सादर केले. तब्बल दोन तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलनाने जडवाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यशस्वीतेसाठी शेतकरी संघटनेचे तालुका सचिव अरुण रागीट, युवा नेते अनिल चपट, उपसरपंच नरेश सातपुते, मोरेश्वर आस्वले, बबन पिदूरकर, चंदू चटप, अरुण काळे, विलास आगलावे, आशिष मुसळे, सरपंच पोतराजे, कैलाश कोरांगे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)शेतकऱ्यांचा बैलबंड्यासह सहभागआंदोलनात परिसरातील तळोधी, एकोडी, भोयेगाव, खैरगाव गावातील शेतकऱ्यांनी बैलगाड्या उभ्या करून रस्ता रोको केले व शासनाविषयी चिड व्यक्त केली. यावेळी भजनातूनही शासनाला रस्त्याची मागणी करण्यात आली. यात शेतकऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भोयगाव-गाडेगाव फाट्यावर शेतकरी संघटनेचे ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 12:48 AM