हंसराज अहीर : भाजीपाला बियाणे वाटपाचा प्रारंभघोडपेठ/नंदोरी : उपजिविकेसाठी केवळ शेती हा पर्याय न ठेवता वेगळे पर्याय शोधा. सिंचन, मोटारपंपाला कनेक्शन आणि नदी जोड उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात संपन्नता आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेतच. त्यातून पुरक उद्योग करा आणि सुखी व संपन्न व्हा, असा सल्ला केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला. शेतकऱ्यांना मोफत भाजीपाला बियाणे वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ गुरूवारी त्यांच्या हस्ते पार पडला. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे शुभारंभ झाल्यानंतर त्यांनी नंदोरी येथील समारंभातून १०० शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. घोडपेठ येथील ग्रामपंचायत भवनात तर नंदोरी येथील हनुमान मंदीराच्या प्रांगणात हा समारंभ पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हसनाबादे, जि.प.सदस्य विजय वानखेडे, अर्चना जीवतोडे, सभापती इंदू नन्नावरे, पंचायत समिती सदस्या वर्षा नन्नावरे, घोडपेठ सरपंच वैशाली उरकुडे, तालुका कृषी अधिकारी पेचे, विजय राऊत, राहूल सराफ, भाजपाचे तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे, शिव सारडा, अभिजित खटी, राजू घरोटे, यशवंत वाघ, तुळशीराम श्रीरामे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले,ना. अहीर म्हणाले, शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याचा संकल्प करुन शेती व शेतकरी हिताच्या योजना राबविणे सुरु केले आहे. सकस आणि पोषणमुल्य असणाऱ्या भाजीपाल्याची आज मोठी मागणी आहे. ग्राहकही यात असलेल्या पोषणमुल्यांमुळे अधिक मुल्य देवून ते खरेदी करण्यास तयार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यालगतच्या गावात भाजीपाला उत्पादन सेंद्रीय पध्दतीने करण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन हा पुरक व्यवसाय व्हावा या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सुरुवातीला ३० गावात भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत भाजीपाला बियाणे वाटप अभियान सुरु करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.यापुढे जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक सातत्याने वाढत राहील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळावा याकरिता शेतकरी बाजारपेठ रस्त्याच्या दुतर्फा सुरु करण्याची योजना आहे. भविष्यात या पुरक व्यवसायासाठी शासकीय बागवानी मिशन आणि अन्य योजनांमार्फत आवश्यक सहाय्य, मार्गदर्शन, सेंद्र्रीय खते उपलब्धीबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याने पुरक व्यवसायाच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारच्या योजनेतून दुग्धव्यवसाय वाढविण्यास जनावरे देणे, मधुमक्षिका पालन, हळद उत्पादन इत्यादी पुरक व्यवसायांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, माजी पालकमंत्री संजय देवतळे, राहूल सराफ यांचीही भाषणे झाली. नंदोरीतील कार्यक्राचे प्रास्ताविक नरेंद्र जीवतोडे यांनी तर संचालन भाऊराव जीवतोडे यांनी केले. शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनो, पुरक उद्योगातून सुखी व्हा
By admin | Published: June 10, 2016 1:04 AM