चंद्रपूर : पुढील चार दिवसात जिल्ह्यात आंशिक ढगाळ हवामान राहून कमाल तापमान ३४.८ ते ३७.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.८ ते १८.३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे. दरम्यान, हवामान आधारित कृषी सल्ला दिला आहे.
उन्हाळी भुईमूग-पेरणी उगवणीनंतर १० दिवसाच्या आत खांड्या भरून घ्याव्यात, तणनाशकाच्या सहाय्याने तणव्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवणपश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉस इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० टक्के एस.एल.१०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रतिहेक्टरी ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर अवश्य करावा, असे आवाहन कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.