लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात धान पिकांसह कापूस, सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वर्षी कापूस पिकावर बोंडअळीने प्रादुर्भाव केला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रादुर्भाव आढळून आला असून, डोमकळ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सध्या कपाशी पीक ५० ते ६० दिवसांचे झाले असून, बऱ्याच ठिकाणी फुलावर येत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच दिसून येत आहे. कीटकशास्त्र विभागाच्या चमूने शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या असता, कपाशी जेथे फुलावस्थेत आहे अशा ठिकाणी डोमकळ्या आढळून आल्या आहेत.
सततचे ढगाळ वातावरण पिकावरील किडींना पोषक असते. किडींचे व्यवस्थापन करण्यास उशीर केल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी त्वरित कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियोजन करावे असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
कपाशीवर कीटकनाशक फवारणी करा पीक उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र कीटकाची १.५ लक्ष अंडी (ट्रायको कार्ड) प्रति हेक्टरी सहा वेळा लावावीत. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील, अशी २० झाडे निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्केपेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
अशी करा उपाययोजना पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्यात. दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझेंडिरेक्टिन ३०० पीपीएम ५० मिली किंवा १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. कामगंध सापळ्याचा वापर करावा, पिकाच्या उंचीनुसार किमान एक फूट उंच अंतर ठेवावे, कामगंध सापळ्याचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय करावेत, मास ट्रॅपिंगकरिता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.