ट्रॅक्टरने घेतली जागा : यांत्रिकीकरणाचा परिणाम
राजेश बारसागडे
सावरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि बहुतेक ग्रामीण भागात अजूनही शेतीच्या कुठल्याही कामासाठी, कुठल्याही धान्याच्या पेरणीपासून तर घरात उत्पन्नाची साठवणूक करण्यापर्यंत शेतकरी कित्येक काळापासून बैलबंडीचाच उपयोग करीत आले आहे. मात्र अलिकडील शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलबंडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने शेतकऱ्यांची बैलबंडी नामशेष होण्याचा मार्गांवर आहे.
शेतीच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून शेतीचे पारंपरिक अवजारे मागे पडून नवनवीन यांत्रिक उपकरणे, मशिनरीज येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी सुद्धा ती स्वीकारणे सुरु केले आहे. आणि शेतीमध्ये आता मोठया प्रमाणात यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. पूर्वी पेरणीपूर्व मशागती पासून मालाची वाहतूक करून घरात साठवणूक करण्यापर्यंत बैलबंडीचाच उपयोग केला जात असे. परंतु अलिकडे घरोघरी ट्रॅक्टर आले असून ट्रॅक्टरचा शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. परिणामी बैलबंडीचे महत्त्व कमी झालेला आहे. मागील काही वर्षांपूर्वी गहू, हरभरा आदी पिकांची सुगी झाल्यानंतर घरी नेण्यासाठी बैलबंडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे.
बॉक्स
अशी होती परंपरा
धान्याने भरलेली बैलबंडी शेतकऱ्यांच्या अंगणात आली की बळीराजा व बैलबंडीचे औक्षवण केल्या जात असे. त्यानंतर औक्षवण केलेल्या ताटात शेतकरी मूठभर धान्य टाकीत असत. मगच कुठे शेतमाल घरात साठविला जात असे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आनंद दरवळत असे. मात्र आता या वैज्ञानिक युगात मळणी यंत्राच्या सहाय्याने सुगी करून धान्य ठेवले जाते. आणि शेतमाल ट्रॅक्टरद्वारा मजुरांच्या साहाय्याने थेट घरी आणला जाऊ लागला आहे.. त्यामुळे औक्षवण करण्याची पारंपरिक पद्धतच बंद पडली आहे..
बॉक्स
मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलबंडी
आजघडीला ग्रामीण भागातील काही मोजक्याच सामान्य शेतकऱ्यांकडे बैलबंडी उरली असून बहुतांश शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामुग्री व ट्रॅक्टरचा मार्ग अवलंबिला आहे. शिवाय बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात बोअर मारल्यामुळे उन्हाळी पीक सुद्धा शेतकरी घेऊ लागले आहेत. आणि धान कटाई व चुराईसाठी यंत्राचाच वापर करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही थोड्या काळातच बैलबंडी कालबाह्य होण्याचे चित्र दिसू लागले आहेत.