प्रविण खिरटकर वरोरातलाठी गावात आल्यानंतर हस्तलिखीत सातबारा घेण्याची पद्धत मागील कित्येक वर्षापासून प्रचलित आहे. आता शेतकऱ्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा गावात बसविण्यात येणाऱ्या एटीएम सारख्या मशीनमधून सातबारा मिळणार आहे.सातबारा शेतीचा असो की घराचा, तो घेण्याकरिता तासन्तास तलाठ्याची वाट बघावी लागत होती. याचे प्रमुख कारण एकाच तलाठ्याकडे अनेक गावाचा प्रभार राहत असल्याने तलाठ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत होती. कोरा सातबारा आणण्याकरिता शेतकऱ्यांना तालुक्याच्या मुख्यालयी जावे लागत होते. यामध्ये शेतकऱ्यांना श्रम व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यानंतर तलाठी कार्यालयाच्या येरझरा मारव्या लागत होत्या. सध्या महाराष्ट्र शासनाने एटीएमसारखी मशीन विकसीत केली आहे. ग्रामपंचायत मध्ये सदर मशीन लावण्यात येणार आहे. या मशीनमध्ये साझाचा रेकार्ड असणार आहे. गावाचे नाव, सर्व्हे क्रमांक तसेच शेतकऱ्याचे नाव टाकल्यावर सातबारा तात्काळ गावातच उपलब्ध होणार आहे. याकरिता प्रत्येक शेतकऱ्याला प्रती सातबारा देण्याकरिता त्या मशीनमध्ये २० रुपये टाकावे लागणार आहे. २० रुपये टाकल्यानंतर लगेच त्या शेतकऱ्याला मशीनमधून सातबारा मिळणार आहे. या मशीनमुळे शेतकऱ्यांना सातबारा घेण्याकरिता लागणाऱ्या वेळेची बचत होईल, असे मानले जात आहे. महाराष्ट्र शासनाने काही गावात प्रयोगीक तत्वावर या मशीन कार्यान्वीत केल्या आहे. यानंतर अलीकडच्या काळात महाराष्ट्रामधील प्रत्येक तलाठी साझ्यामध्ये सातबारा मिळणारी मशीन दिसणार आहे.
शेतकऱ्यांना गावातच मिळणार मशीनद्वारे सातबारा
By admin | Published: February 15, 2017 12:37 AM