संघटना तटस्थ: अनेक योजनांचे साहित्य वाटप बंदगोंडपिपरी : सध्या राज्यभरात सुरु असलेल्या पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध मागण्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी वर्गाला याचा चांगलाच फटका बसत असून येथील पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कार्यालयाची दैनंदिन पायपीट करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ग्राम विकास मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने अनेकदा वरिष्ठांसोबत चर्चा केली. मात्र समस्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने धरणे आंदोलनेही झालीत. त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक दृष्टीकोन असल्याचे दर्शविल्याने काही काळाकरिता कृषी संघटनेने आंदोलन मागेही घेतले. परंतु समस्या निकाली व काढल्याने अखेर ३ आॅक्टोबर २०१६ पासून कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने आंदोलनाची तिव्रता वाढवून लेखणी बंद आंदोलन सुरु केले.बेमुदत सुरु असलेल्या या आंदोलनामुळे तालुक्यातील अनुसूचित जाती, जमातीमधील दुर्बल घटक शासनाच्या जनकल्याणकारी योजनापासून वंचित राहत असून या आंदोलनामुळे साहित्य वाटप, नवीन अर्ज स्वीकारणे बंद आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच आचार संहिता लागू होत असून शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचणे कठीण जाणार आहे. शासनाने संघटनासोबतचा तिढा सोडवून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
कृषी विभागाच्या लेखणी बंदचा नागरिकांना फटका
By admin | Published: October 13, 2016 2:24 AM