चंद्रपूर : संगणकीय युग आले असले तरी आजही ग्रामीण भागामध्ये वातावरणातील बदलाबाबत पाहिजे तशी शेतकऱ्यांना माहितीच होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच कृषी विभागाचे असलेले किसान ॲपबाबतही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे कृषी विभागाने अधिक गतीने जनजागृती करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हवामानाबाबतची अद्ययावत माहिती पुरविण्यासाठी यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. कापूस, सोयाबीन, धान, तूर हे मुख्य पीक असले तरी अन्य पिकेही शेतकरी घेतात. सोबतच सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी भाजीपाला लावतात. मात्र, निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना हवामानाबाबत अद्ययावत माहिती हवी असते. त्यानुसार ते आपल्या शेतातील पिकांची जोपासना करू शकेेल. मात्र, बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी किसान ॲप डाऊनलोड केले आहे. मात्र, त्यांनाही अद्ययावत माहिती पोहोचत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, नुकतेच आलेल्या वादळाची माहिती उशिराने मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे ॲप असूनही कामाचे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नैसर्गिक नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने अद्ययावत यंत्रणा तयार करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
किसान ॲपवर काय मिळते माहिती
१. दररोजच्या हवामानाचा अंदाज देण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे.
२.शेती आणि शेतामधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कीड रोग नियंत्रण करणे, माती परीक्षण यावर विविध विषयांचे मार्गदर्शन
सतर्कतेचा इशारा, हवामान अंदाज, अतिवृष्टीसारखा इशारा, आदी.
बाॅक्स
अपडेट वेळेत मिळावे...
शेतकऱ्यांना वेळेमध्ये संपूर्ण माहिती मिळावी, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजना यावर माहिती आणि नवीन तंत्रज्ञान याची माहिती मिळावी.
हवामानाचा अंदाज वेळेपूर्वी मिळाल्यास कृषी क्षेत्रातील नियोजन शेतकऱ्यांना करता येते.
कोट -
माहिती वेळेपूर्वी मिळावी
शेती निसर्गाच्या भरवशावर असते. निसर्गाने साथ दिली तर शेतकऱ्यांचा फायदा, नाही तर तोटा होतो. अनेकवेळा नुकसानीलाच सामोर जावे लागते. कृषी विभागाने अद्ययावत यंत्रणा तयार करून प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती पुरविली तर नुकसान टाळता येईल.
- केतन बोबाटे
-
हवामान, तसेच इतर माहिती तत्काळ मिळाल्यास शेतकरी अलर्ट होतील. परिणाम नुकसान टाळणे शक्य होईल. मात्र, अद्ययावत माहिती मिळत नाही. दिवसेंदिवस शेती करणे परवडण्यासारखे नाही. त्यातच भावही मिळत नाही. नैसर्गिक नुकसान तर वेगळेच आहे.
मारोती कोंडेकर
-
प्रत्येक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही. त्यामुळे काही जण निसर्गावरच अवलंबून आहे. जेव्हा वादळ-वाऱ्यातून जे शिल्लक राहील ते शेतकऱ्यांचे अशी अवस्था आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अशी यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे.
-द्रौणाचार्य गेडाम
--
कोट
किसान ॲपबाबात अद्याप एकही तक्रार कार्यालयात आली नाही. हवामानाच्या अंदाजाबाबात तसेच इतर माहिती सध्या उपलब्ध असलेल्या विविध साधनांद्वारे, तसेच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवीत असतो.
-भाऊसाहेब बऱ्हाटे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर.