लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सोयाबीनच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. नवे सोयाबीन बाजारात येताच व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहे. क्विंटलमागे हजार रुपयांची घसरण झाली आहे. मागील महिन्यात पाच ते सहा हजारांवर असलेला सोयाबीनचा भाव आता चार ते साडेचार हजारांवर आलेला आहे. त्यामुळे सोयाबीनची दरवाढ झाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. अन्यथा यंदा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.यंदा दोन-अडीच महिन्यांपासून सतत पाऊस सुरू आहे. किमान दीड ते दोन लाख हेक्टरवील सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादनात कमी येणार आहे. काढणीच्या हंगामातही मध्ये-मध्ये पाऊस सुरू आहे. सोयाबीनच्या गंज्या पावसाने भिजत आहेत. गतवर्षी सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. नंतर कमी होऊन तो पहिले आठ व नंतर सहा हजार रुपयांवर स्थिरावला होता. मात्र सोयाबीनचा हंगाम सुरू होताच दरात घसरण सुरू झाल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाव वाढवण्याची मागणी होत आहे.
सोयाबीनवर केलेला खर्चही निघेनायंदा पावसाने वेळी अवेळी हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. उताराही कमी झाला आहे. सोयाबीन वरील खर्चही निघणार की नाही,अशी भीती आहे.
मूग, उडदाची आवक निरंकजिल्ह्यातील मूग व उडदाचे पीक उशिराच्या पावसाअभावी बाद झाले आहे. यामध्ये जे पीक बचावले,ते अतिवृष्टीमुळे खराब झाले असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मूग व उडदाची आवक निरंक असल्याचे दिसून येते.
पावसामुळे सोयाबीनचे भाव घसरलेनव्या सोयाबीनमध्ये अधिक आर्द्रता असल्याने दरात कमी आलेली आहे. जुन्या सोयाबीनचे दर मात्र पाच हजारांच्यावर आहे. याशिवाय पावसाने भिजलेले सोयाबीनचे दर २२०० पासून सुरू आहेत.
शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीतजेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पीक येते. तेव्हा नेहमीच दर कमी केले जातात. त्यामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. किमान आठ हजारांच्या वर भाव देणे गरजेचे आहे. - सखाराम सोनुले, शेतकरी
दरवर्षीच शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना सामोर जावे लागते. परंतु, शासनाकडून हवा तेवढा भाव कधीच शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्यामुळे ते नेहमीच कर्जबाजारी असतात. - पवन मडावी, शेतकरी