राजेश माडुरवार
चंद्रपूर : शेतात पाणी, घरात आणि वस्तीतही पाणीच पाणी. या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात देखील पाणी आणलं. जिथे माणस पुरापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे. तिथे हा बळीराजा शेतातील खत सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी माणूसभर पुरात उतरला आहे. या पुरामुळे बळीराजाची स्थिती हवालदिल झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातील ही परिस्थिती खचलेल्या बळीराजाची बिकट स्थिती दर्शवणारा आहे.
तेलंगणा सीमेवरील वर्धा नदीला आलेल्या पुरातील पाण्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती पाण्याखाली गेली. पूर वाढतच आहे. त्यामुळं उर्वरीत शेती पाण्याखाली वाढण्याचा धोका वाढला आहे. शेतपिकांना खत टाकण्यासाठी खत पूर्वीच शेतात नेल्या गेलं होतं. अशावेळी नदीची पातळी वाढत असल्याने खत पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला होता. यातच डोग्यांने पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत वाचविण्यासाठी धडपड करीत आहे.
पिके पाण्याखाली असून ती कुजण्याचा धोका वाढला आहे. अशावेळी दुबारपेरणी केल्यावर किमान सध्यातरी उरलेसुरले खत कामी येईल, ही आशा बळीराजाला आहे. त्यामूळं जिवघेण्या पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत सुरक्षितस्थळी हलवित आहे. मात्र त्यांचा हा डोंग्यावाटे होणारा प्रवास जीवघेणा ठरला आहे. या पुराचा फटका अडेगांव, दरुर, नंदवर्धन, शिवणी देशपांडे, पानोरा येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
गोंडपिपरी तालुक्याच्या सिमावर्ती भागातील गावकऱ्यांनी काही दिवस सतर्क राहण्याची गरज आहे.शेतकऱ्यांनी सुद्धा हवामानाचा अंदाज घेऊन पाऊले उचलावी.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वे सुरु आहेत.
- के.डी.मेश्राम,तहसिलदार,गोंडपिपरी.