- घनश्याम नवघडे ( चंद्रपूर )
निसर्गाच्या अवकृपेमुळे हताश न होता, काही शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत इतर पिके घेऊन शेती व्यवसाय कसा फायदेशीर आहे, याचा प्रत्यय आणून देतात. चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव, ता. नागभीड येथील दिनेश पाथोडे यांनी असेच उदाहरण इतर शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. त्यांच्या अख्ख्या कुटुंबानेच शेतीला वाहून घेतले आहे.
शेतीतून ते वर्षाकाठी दहा ते बारा लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत असून, यामुळे त्यांचे कुटुंब समृद्ध झाले आहे.दिनेश यांची गावालगतच वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. या शेतीत वर्षभर भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन परिसरातील शेतकऱ्यांसाठी ते मैलाचा दगड ठरले आहेत. दिनेशचे वडील शंकर पाथोडे यांचा मूळचा टेलरिंगचा व्यवसाय. या व्यवसायात त्यांची कशीबशी गुजराण सुरू होती. अशातच गावातील एका शेतकऱ्याने शंकररावांना भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा सल्ला दिला.
परिस्थितीने हतबल असलेल्या शंकररावांनी हा सल्ला मनावर घेतला आणि आपल्या एकरभर शेतीत ते भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले. वर्ष, दोन वर्षांनंतर यात त्यांना बऱ्यापैकी पैसा दिसू लागल्याने टेलरिंगचा व्यवसाय सोडून त्यांनी मग शेतीवरच लक्ष केंद्रित केले. वर्षभरात ते विविध भाजीपाल्यांची पिके घेऊ लागले. घरी असलेली दीड एकर शेती त्यांना कमी पडू लागली. मग त्यांनी शेतीला लागून असलेली सभोवतालची सहा-सात एकर शेतजमीन याच नफ्यातून हळूहळू खरेदी केली. आता या सर्व शेतीत ते वर्षभर भाजीपाल्याची लागवड करीत आहेत.
आता दिनेश यांनीेही नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून व शेतीलाच व्यवसाय मानून स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतले आहे. दिनेशचे वडील शंकरराव, पत्नी आणि आई अगदी सकाळपासूनच शेतामध्येच असतात. एवढेच नाही तर गावातील सात-आठ महिलांना वर्षभर पाथोडे यांच्या शेतीच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होत आहे. आज जो नागभीडला भाजीपाला उपलब्ध होत आहे, त्यातला निम्मा वाटा पाथोडे यांचा आहे. एवढेच नाही तर वांगी, कारले, टोमॅटो, कोबी, कोहळा, पपई, लौकी यासारखे भाजीपाल्याचे वाण ते नागपूरला निर्यातही करीत आहेत. भाजीपाला निर्यातीसाठी त्यांनी स्वत:ची वाहनेही घेतला.
तीन एकरांत शतावरीत्यांनी तीन एकर जागेत शतावरी या वनौषधीची लागवड केली आहे. शतावरीचा हा प्रयोग या तालुक्यात तरी नवीन आहे. पाथोडे यांनी शेतात आठ ठिकाणी विंधन व दोन ठिकाणी विहिरी खोदल्या आहेत. भाजीपाल्यांसोबत त्यांनी यावर्षी पपईचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. शतावरी या वनौषधीचा त्यांनी शेतात प्रथमच प्रयोग केला आहे. नफा दिसला तर शतावरीसोबतच इतरही वनौषधींचे उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. अतिशय बेताची परिस्थिती असूनही पाथोडे केवळ आपल्या मेहनतीने परिस्थितीवर स्वार झाले आहेत. शेतीच्या क्षेत्रात पाथोडे कुटुंब संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरले आहेत.