दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले
घनश्याम नवघडे
नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव म्हणजे धानाची रोवणी. यावर्षी चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी या उत्सवाला सुरूवात केली आहे. या उत्सवाने शेतकऱ्यांच्या आनंदाला चांगलेच भरते आले असून हा आनंद शिवारातूनही ओसंडून वाहत आहे.
नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. आणि या पिकावरच शेतकऱ्यांची वार्षिक गणिते अवलंबून असतात. कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा, मुलामुलींचे लग्नकार्य, औषधपाणी, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन आदी अनेक बाबींचा यात समावेश आहे.
तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६६०.४५ हेक्टर आहे. यातील वाहितीखालील क्षेत्र ३१ हजार २०५.४९ हेक्टर असून यापैकी जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. या धानाच्या हंगामासाठी अगोदर पऱ्हे टाकावे लागतात. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर पऱ्हे टाकण्यास सुरूवात होते. जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. मात्र यावर्षी योग्य पाऊस पडल्याने पऱ्हे यापूर्वीच टाकून झाले व वाढही योग्यप्रकारे झाली. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते. यावर्षी पऱ्ह्यांचा हंगाम योग्य व वेळीच झाला आणि पाऊसही आवश्यकतेनुसार पडत असल्याने रोवणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे.
बॉक्स
अशी आहे मजुरी
अगदी सकाळी ७ वाजेपासून हे शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामास लागत असून संध्याकाळी ६ वाजता मोकळे होतात. एरव्ही १०० ते १२५ रूपये असणारी एका स्त्रीची एका दिवसाची मजुरी २०० रूपयापर्यंत गेली आहे. पुरुषाला ३०० रूपये मिळत आहेत. महिला वर्गाकडून गट स्थापन करून दरएकरी पऱ्हे व रोवणी करण्याचे तीन हजार रूपये घेण्यात येत आहेत.
बॉक्स
शेतीतून चार महिने काम
शासन मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या कितीही वल्गना करीत असले तरी हे खरे नाही. मजूर वर्गाला सतत तीन महिने काम देण्याची शक्ती फक्त शेती आणि शेतीतच आहे. रोवणीचा हा हंगाम साधारणतः २५ ते ३० दिवस, त्यानंतर निंदन, धान कापणी यात मजुरांना नियमित रोजगार मिळत असतो. याशिवाय ट्रॅक्टर, कृषी केंद्र यांचेही अर्थचक्र गती पकडत असते.