सिंदेवाही: मागील चार दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते आदींची खरेदी करून ठेवली. काहींनी पेरणी सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे हंगामासाठी पैसाच नाही. ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
परिणामी शेतकरी सावकाराच्या दारात पोहोचत आहेत. संधीचे सोने करण्यासाठी टपून बसलेल्या सावकारांना आता आयतेच सावज मिळू लागले आहे. शासनाच्या कर्जमाफीनंतरही अनेक शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली नाही. अनेकजण कर्जबाजारीच आहेत. त्यांना बँक कर्ज देत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतीच्या बी-बियाणे खरेदीसाठी सावकाराच्या दारात गेल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. सावजाच्या शोधात असलेले काही नियमित सावकार शेती गहाण केल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे देत नाही. काही सावकार सरळ विक्रीपत्र करून घेऊन पैसे देतात. ही गोष्ट सावकार व शेतकरी यांच्यातच अनेक दिवस गोपनीय राहते. कालांतराने ही प्रकरणे बाहेर येतात. दरवर्षी शेतकरी आपल्या व्याजसह हिशेब करून सावकाराचे कर्ज मोकळे करतात. ही परंपरा चालत आहे. पेरणीसाठी कृषी केंद्राकडून बी-बियाणे व खते या वस्तू नगदी घ्याव्या लागतात. हातात पैसा असला तर हे सर्व ठीक आहे, मात्र हातात पैसे नसले तर शेतकऱ्यांची फजिती होते.
बॉक्स
दागदागिने गहाण
सिंदेवाही तालुक्यात अशीच स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. कसेही असले तरी पेरणी योग्यवेळी करावीच लागते. अशा वेळेस वाटेल ती तडजोड करून प्रसंगी घरच्या लक्ष्मीच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवले जातात. अशी पाळी सध्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.