गडचांदूर : शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दीड ते दोन वर्षांपासून शेतातील वीज जोडणीचे डिमांड भरूनही अजूनपर्यंत शेतात वीज न पोहचल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.गडचांदूर व कोरपना या दोन्ही ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची कामे करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पैसे घेऊन काम करून देण्याचा प्रकार येथे होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. राजकीय पाठबळ असलेले व सदन शेतकरी पैसे देऊन आपली कामे तत्काळ करून घेतात. त्यांना कसलेही नियम सांगण्यात येत नाही. मात्र आपला क्रमांक लागेल, या आशेने शेतातील वीज जोडणीची वाट पाहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठी मात्र मराविमंच्या अधिकाऱ्यांकडे नियमांचे मोठमोठे ग्रंथ आहे. तुमचा क्रमांक आल्याशिवाय काम चालू होणार नाही. अशीच भाषा ऐकायला मिळत असल्याने. शेतकरी सध्या त्रस्त झाले आहे.तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, मानोली, थुट्रा, गाडेगाव, सोनुर्ली (गाडे), विरूर, तळोदी, भोयगाव, कवठाळा, कढोली (खु), सांगोडा, वनोजा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, कोरपना, लोणी, वनसडी, धानोली, कोडशी, परसोडा, पारडी अशा अनेक गावातील शेतकरी कंपनीच्या या धोरणामुळे हैराण झाले आहेत.या धोरणामुळे वीज कार्यालयातील अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित केले जात आहे. प्रतीक्षा यादीत क्रमांक आल्यानंतरही त्यांना कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर नादुरूस्त असल्यामुळे सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. ट्रान्सफार्मर सुरू केल्यानंतरही एक-दोन दिवसातच पुन्हा बंद पडतात. ट्रान्सफार्मर उपलब्ध नसल्यामुळेही अनेक शेतकऱ्यांना विजेअभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र आपली अडचण सांगायची कुणाला, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वीज जोडणीविषयी समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)
वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट
By admin | Published: November 19, 2014 10:35 PM