छायाचित्र
खांबाडा : पिकांवर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पंपाच्या ओझ्यामुळे त्रस्त झालेले सुसा येथील युवा शेतकरी श्रीकांत एकुडे यांनी कापणी यंत्राचे फवारणी यंत्रात रूपांतरित करून या ओझ्यापासून सुटका केली आहे. हे यांत्रिक जुगाड अतिशय स्वस्त आणि उपयोगी असून, शेतकऱ्यांचा श्रम, वेळ व पैसाही वाचणार आहे.
पिकांवर फवारणी करणे हे शारीरिक श्रमाचे काम आहे. त्यामुळे अशा कामांसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. सामान्य मजुरांपेक्षा फवारणी करणाऱ्यांना ज्यादा पैसे द्यावे लागतात. त्यामुळे हे काम खर्चीक आहे. शिवाय उभ्या पिकात फवारणी करणे धोकादायक असल्यामुळे टाळावे लागते. यामुळे हातचे पीक वाया जाते. हा अनुभव गतवर्षी सोयाबीन पिकाबाबत आला होता. ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी करणारे यंत्र सध्या उपलब्ध आहे. परंतु हा खर्च लहान शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे या संकटातून मुक्ती मिळविण्यासाठी सुसा येथील श्रीकांत एकुडे यांनी कापणी यंत्राचे चक्क फवारणी यंत्रात रूपांतर केले. या यंत्रामुळे फवारणीचे काम अतिशय कमी खर्चात होईल, असा दावा एकुडे यांनी केला आहे.
असा तयार झाला जुगाड
फवारणी यंत्र तयार करण्यासाठी ५० लिटर पाण्याची कॅन, लोखंडी पिंजरा, जुन्या पंपाची बॅटरी, मोटर व नळ्यांचा वापर केला आहे. या यंत्राद्वारे अर्धा तासात किमान एक एकरात फवारणी करता येते. यासाठी फक्त ३०० मिली पेट्रोल लागते. यंत्राचा वापर सोयाबीन व कापूस, भाजीपाला पिकांवरही करता येतो. सोयाबीन पिकात वापरण्यासाठी पट्टा पद्धतीचा वापर केला जात आहे. लहान कापणी यंत्र उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना असा यांत्रिक जुगाड सहजपणे करता येतो, अशी माहिती शेतकरी श्रीकांत एकुडे यांनी दिली.
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने घेतली प्रेरणा
राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी तसेच सोयाबीनच्या एसबीजी ९९७ या वाणाचे संशोधक सुरेश बापुराव गरमडे यांनी श्रीकांत एकुडे यांनी तयार केलेल्या फवारणी यंत्राची पाहणी केली. त्यांनीही यापासून प्रेरणा घेऊन यांत्रिक जुगाडातून अशा प्रकारचे यंत्र तयार केले. हे फवारणी यंत्र तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी एकुडे यांनी दर्शविली आहे.