राजेश बारसागडे
सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरातील सावरगाव, वाढोणा, जीवनापूर आदी गावांतील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांतर्फे धान खरेदी करण्यात आली. दरम्यान, प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस शासनाने जाहीर केला. यापैकी अर्धी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. मात्र, सहा महिने लोटूनही उर्वरित ३५० रुपये शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने, शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
मागील खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत नोव्हेंबर, २०२० ते मार्च, २०२१ या कालावधीत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या विविध केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आलेली होती. या धान खरेदी पोटी १,८६८ एवढी रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळालेली होती. व प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला होता. यापैकी ३५० प्रति क्विंटलप्रमाणे बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. मात्र, ३५० रुपये उर्वरित रकमेचा बोनस शेतकऱ्यांना सहा महिने लोटूनही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिककोंडी झाली असून, प्रशासनाप्रति त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीत खरीप हंगाम सुरू असून, खते, औषधी, मजुरी आदी खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे, परंतु हा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. या बाबीची शासनाने वेळीच दखल घ्यावी व बोनसची उर्वरित रक्कम तातडीने जमा करावी, अशी सावरगाव परिसरातील समस्त शेतकरी वर्गाची मागणी आहे.
कोट
बोनसची उर्वरित दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल, असे शासनाने आश्वासन दिले होते, परंतु दीर्घ प्रतीक्षेनंतरही रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
- शिवशंकर कृ.सहारे, उपाध्यक्ष
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, सावरगाव.