कोरपना : तालुक्यातील बोरगाव (इरई) येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी वनसडी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी धडक देऊन वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे संरक्षण व्हावे याकरिता वनविभागातर्फे सोलर बॅटरी मशीन मंजूर करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांनी निवेदन स्वीकारले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये रानटी डुक्कर, रोही यांसारख्या वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना सदर बाबींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतमालांची राखण करण्यासाठी रात्रपाळीमध्ये जागरण करून वन्यप्राण्यांपासून आपल्या शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागत आहे.तसेच शेतकऱ्यांनासुद्धा वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो.
या बाबीची दखल घेत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष ताजने यांनी सर्व शेतकऱ्यांसह वनपरिक्षेत्र अधिकारी यांना प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देऊन निवेदन सादर केले. तसेच वन्यप्राण्यांचा त्रास हा परसोडा, पारडी, कोठोडा, जेवरा, तुळशी, गांधीनगर, कोडशी, शेरज, पिपरी, नारंडा, वनोजा, अंतरंगाव बु,सांगोडा, गाडेगाव, भारोसा, भोयगाव इत्यादी गावांना असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली. यावेळी अरुण नवले, नरेंद्र धाबेकर, गोकुळदास बुच्चे, विनोद बावणे, सोनू बुच्चे, अजय लिगमे, लटारी खवसे, शरद बोधे, अरुण गोहोकर, पुरुषोत्तम गोहोकर, चंद्रभान बुच्चे, खुशाल नगराळे, प्रमोद देरकर, भरत पथाडे, हेमंत खुजे, गजानन चौधरी, किशोर बोधे, संजय बोधे, मारोती घोरुडे, शंकर बुच्चे उपस्थित होते.