पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण : जिल्हा विकासाचा कृती आराखडाही मांडलाचंद्रपूर : सन २०२१ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र चंद्रपूर जिल्हयात २०१९ पर्यतच हे उद्दिष्ट पूर्ण करा. राज्य शासनाच्या उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानातील शाश्वत शेतीचे सर्व प्रयोग चंद्रपूरमध्ये शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणेने मिशन मोडवर कामाला सुरुवात करावी, असे आवाहन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र दिनाला पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी जिल्हयाच्या विकासाचा कृती आराखडा मांडत राज्यातील सर्वाधिक विकसित जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नावलौकीक वाढविण्याचे प्रतिपादन केले. महाराष्ट्र दिनाला चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाकडून मानवंदना स्वीकारात त्यांनी विविध पथकाचे निरीक्षण केले. त्यानंतर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. कधी काळी अविकसित जिल्हा म्हणून चंद्रपूरचा नामोल्लेख व्हायचा. मात्र आता राज्यातील सर्वाधिक विकसित जिल्हा म्हणून जिल्हयाचे नाव पुढे आले पाहिजे, यासाठी शासकीय यंत्रणेने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषी विभागाच्या संदर्भात विविध योजनांचा नामोल्लेख करीत त्यांनी चंद्रपूर जिल्हयामध्ये उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानातील सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. जिल्हयातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक गतीशिल होण्याचे त्यांनी आवाहन केले.आजपासून सुरु होणाऱ्या पंडित दिनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाला शुभेच्छा देताना नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हयाची यासाठी निवड झाली असून जिल्हयातील आरोग्य यंत्रणेला पुरक ठरणाऱ्या रुग्णांच्या आजाराची माहिती संकलनात आघाडी घेण्याचे आवाहन केले. यापूर्वी आपण सिटी स्कॅन यंत्रणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारली आहे. आता शिरडी साईबाबा संस्थाकडून चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाला एमआरआय मशिन व प्रत्येकी २० अॅम्बुलन्स मिळत असल्याची शुभवार्ताही यावेळी त्यांनी सांगितली.चंद्रपूर जिल्हयात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजना लागू केली आहे. जन-जल-जंगल-जमीन या संसाधनाच्या शाश्वत विकासातून उत्पादकता वाढविणे, गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे, मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणे आदी उद्देश सफल होण्यासाठी असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे त्यांनी आवाहन केले. जात-पात, धर्म- पंत सोडून जंगल भागातील प्रत्येक गावातील सर्व नागरिकांना मोफत गॅस वितरण होणार आहे. या योजनेच्या शंभर टक्के यशस्वीतेसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या नवनव्या उपलब्धतेची मांडणी करताना त्यांनी चंद्रपूर ही गुणवाण एकलव्यांसारख्या प्रतिभांची भूमी आहे. दुर्गम आदिवासी भागातील मुलांना हेरुन त्यांना उत्तमोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन त्यांनी केले. चंद्रपूरच्या खेडाळूंनी आॅलिम्पिंक स्पर्धेमध्ये नावलौकिक मिळवावा, असे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी पोलीस, महसूल, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रमेश बरडे, विजय बोरीकर, विजय गेडाम, रामकृष्ण सोनुने या पोलीस कर्मचाऱ्यांचा तर उर्जानगर येथील विकलांग सेवा संस्था, भिमराव पवार व तलाठी एम.आर.दुबावार यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, स्वातंत्र सैनिक, अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. पोलीस परेडचे संचालन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे व पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन मंगला आसुटकर व मोन्टूसिंग यांनी केले. (शहर प्रतिनिधी)जिल्ह्यातील पायाभूत सुविधांमध्ये बदल१८६ कोटीची वन अकादमी, बहुआयामी बॉटनिकल गार्डन, बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र, जिल्हयातील शाळांचे डिजीटायझेशन, विविध तालुक्याच्या ठिकाणी निमार्णाधीन बसस्थानक, पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने, नियोजन भवनाचे निर्माण, इंदीरा गांधी प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहाचे निर्माण, तालुक्याच्या ठिकाणी तयार होत असलेली क्रीडागंणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निमार्णाधीन इमारती यामुळे चंद्रपूर जिल्हयातील पायाभूत सुविधांमध्ये प्रंचड बदल नजीकच्या काळात होणार आहे. या विकासाच्या पर्वामध्ये तुमच्या सर्वांचा सहभाग व सक्रीयता आवश्यक असून यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी केले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
By admin | Published: May 02, 2017 12:57 AM