भिसी : येथून सात किमी अंतरावरील वाढोणा येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना बुधवारी पहाटे घडली.
गजानन मुकुंदा ढोणे (वय ५५ ) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. गजानन ढोणे यांचा कान वाघाच्या हल्ल्यात अर्धवट तुटला. त्यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास वसंता मारोती जांभुळे यांच्या गावाशेजारी असलेल्या गोठ्यात शिरून बिबट्याने गायीची शिकार केली. त्यामुळे वाढोणा येथील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
गजानन ढोणे हे शेतातील गोठ्यात झोपले असता पहाटे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ढोणे यांच्या पाठीवर, डोक्यावर बिबट्याच्या नखांमुळे जखमा झाल्या. तसेच त्यांचा डावा कान अर्धवट तुटला. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथे उपचारार्थ आणण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी संतोष औतकर, अंकुश मोरे व प्रमोद लुचे दवाखान्यात हजर होते.
घटनास्थळी चौकशी व पंचनामा करण्यासाठी चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे, भिसीचे वनपरिमंडळ अधिकारी संतोष औतकर घटनास्थळी दाखल झाले होते.
बिबट्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा वाढोणा येथील ग्रामस्थांनी वन विभागाला दिला आहे.