चंद्रपूर : आज चंद्रपूर येथे पार पडलेल्या मराठा कुणबी क्रांती मोर्चात जिल्ह्यातील ग्रामीणांचा मोठा सहभाग दिसून आला. यात राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती, मूल, गोंडपिपरी आदी तालुक्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत मोर्च्यात चालणाऱ्यांची संख्या दिसून आली. चंद्रपूर येथील गांधी चौकात मोर्चा धडकल्यानंतर जटपुरा गेटपर्यंतची रांग आणि भगवे झेंडे सर्वांनाच अवाक् करून गेले. मराठा-कुणबी मोर्चामध्ये शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, कर्जमाफ करावे आदी मागण्या असल्याने शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती यात दिसून आली. तब्बल नऊ किलोमीटरचे अंतर कापूनही उत्साह कायमच दिसत होता. यातील काही वृद्ध चालून दमल्यानंतर त्यांना ग्रामीण भागातून मिळेल त्या वाहनांनी काहींनी हजेरी लावली. सकाळी ९ वाजेपासून चंद्रपूर मार्गाने ग्रामीणांची वारी सुरू होती. आंध्रप्रदेश लगतच्या गावामधुनही मोठ्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले होते. गेल्या एक महिन्यापासून गावागावात जनजागृती झाली होती.
शेतीकामे सोडून शेतकऱ्यांनी लावली हजेरी
By admin | Published: October 20, 2016 12:46 AM