सिंदेवाही : पावसाळ्यात यावर्षी मान्सून वेळेत पोहोचताच सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पेरणी करिता योग्य पावसाची प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या केल्या. सुरुवातीचे चार-पाच दिवस चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पाऊस आला नाही आणि उन्हाळा असल्यासारखी ऊन तापत आहे.
पावसाळ्यात भरपूर प्रमाणात सुरुवातीला पाऊस पडतो. शेतकरी सुखावला जातो. यंदाही असेच झाले. पावसात सातत्य नाही. आता तर आठवडाभरापासून सिंदेवाही परिसरात पाऊस हुलकावणी देत आहे. तापमानात झालेली वाढ, यामुळे पिके काेमेजली असून पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहे. हवामान विभागानुसार पावसाचे पुनरागमन होईल, असे संकेत देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज फोल ठरला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक, मेघगर्जना होऊन हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला होता. मात्र सिंदेवाही परिसरात पाऊस आला नाही. पीक वाढीसाठी पावसाची नितांत गरज आहे. पावसाळ्यातील या आठवडाभरात पाऊस न येणे म्हणजे शेतकऱ्यांचे पिकास धोका होणे आहे. दुबार पेरणी करावी लागल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे.