देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरात पावसाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जन पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे... पाण्यावाचून तळमळते आता सारे गावरे अशी आर्त विनवणी करुन देवाला साकडेही घातले जात आहे.असे असले तरी पंढरीचा पांडुरंग अद्याप तरी शेतकऱ्यांना पावला नाही. आषाढीच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत असताना शेतकऱ्यांच्या मनात मात्र शेती शिवाराची चिंता होती. पावसाने दडी मारली असल्याने दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. दोन ते चार दिवसांपूर्वी मध्यम पाऊस आला. त्यामुळे अनेकांनी कापूस, सोयाबिन धान पऱ्हे व इतर पिकांची पेरणी केली. पाऊस झाला पण लगेच कडक उन्ह तापू लागले. त्यामुळे देवाडा परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली असल्याने यंदाही दुष्काळचा सामना करावा लागेल, असे दिसत आहे. चांदणे पांघरलेली रात्र मनाला मोहून घेत असली तरी शेतकऱ्यांच्या उरात मात्र धडकी भरत आहे. कधी एकदाचा पाऊस येतो, रान चिंब भिजंते आणि शेतशिवार हिरवेगार होते, याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. राजुरा तालुक्यात देवाडा, पंचायत समिती परिसरातील मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबिन, धान व इतर पिके लावली आहे. परंतु पाऊस यायचे नाव घेत नाही. धानाचे पऱ्हे पाऊस नसल्याने करपायला सुरुवात झाली आहे. गावागावात पावसासाठी देवाकडे साकडे घातले जात आहे. माता मंदिर, राम मंदिर, भुदेवी, लक्ष्मीदेवी शिवमंदिर, गायत्री मंदिर येथे जाऊन देवांना पाण्याने आंघोळी करुन विनवणी केली जात आहे. कुणी तर पूजाअर्चा करत भक्ती गिते, भजन, कीर्तन यांचे आयोजन करीत आहेत. पावसाअभावी पिके करपत असताना कृषी विभाग मात्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत नाही. त्यामुळे देवाडा परिसरातील परिस्थिती अंत्यत वाईट आहे. (वार्ताहर)
पावसासाठी शेतकऱ्यांचे साकडे
By admin | Published: July 23, 2015 12:52 AM