अशोक चव्हाण यांचा आरोप : महिला बचत गट मेळावाचंद्रपूर : महिला बचतगटाला आत्मनिर्भर बनविण्याचे खरे कार्य सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून काँग्रेसच्या काळात झाले आहे. गटाला चार टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले. परंतु सत्तेवर येताच भाजप सरकारने महिला बचतगटाला सक्षमीकरण करण्याऐवजी सवलतीच्या योजना बंद करून त्यांना वेठीस धरले आहे. दुष्काळाच्या काळात कर्जमाफी दूर परंतु उत्पादित मालाही योग्य दर दिला नाही. त्यामुळे तो हवालदिल झाला आहे. त्यांचा आवाज सरकारला ऐकू येत नाही. त्यामुळे महिला व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या शासनाला धडा शिकवण्याचा निर्धार करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी व महिला बचतगट मेळाव्यात बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ उपगट नेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस कमिटी सचिव प्रमोद तितरमारे, माजी आ. सुभाष धोटे, प्रदेश महासचिव झिया पटेल, प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, ज्येष्ठ नेत्या रजनी हजारे, विजया बांगडे, डॉ.आसावरी देवतळे, चंद्रपूर विधानसभा महेश मेंढे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदींची उपस्थिती होती.खा. अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, काँग्रेसने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण घोषित करून ग्रामीण सत्तेची चाबी सोपविली आहे. त्यांना आत्मसन्मान प्रदान केला. लोकसभेतही तिचा योग्य गौरव व्हावा म्हणून आरक्षण देण्याची सोनिया गांधी यांची भूमिका आहे. आज देशात व राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहे. दुष्काळस्थितीतही त्यांचे अश्रू पुसण्याचे काम भाजपा सकारकडून होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गतवर्षी धानाला दोन हजारपेक्षाही हमीभाव दिल्याने उत्पादन खर्चही निघू शकला नसल्याने कर्जाचा डोंगर वाढला आहे.अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचत गटांना पूर्वीप्रमाणेच चार टक्के व्याज दराने सवलतीने कर्ज देण्याचे बचत गटांच्या महिलांना दिले होते. परंतु आश्वासन पाळले नसल्याने गटाला १० टक्के व्याज दर द्यावा लागत आहे. त्यामुळे महिलांचा विश्वास फडणवीस सरकारने गमावले असल्याचा आरोप खा. चव्हाण यांनी यावेळी केला.माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी निवडणुकीच्या काळात गोरगरीब व शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळता येत नसेल तर भाजपा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याची टिका यावेळी केली.भाजपा सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला असल्याने सामान्यमाणसाच्या ताटातील तुरीची डाळ गायब झाली. धानाला भाव नाही. याउलट केवळ प्रस्थापित व्यवस्थेचे लाड पुरविण्यातच राज्य सरकारला स्वारस्य आहे. चंद्रपूरसह अन्य जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंतेत सापडला आहे. या ठिकाणी ओला दुष्काळ घोषित न झाल्यास शेतकऱ्यांचे जगणे आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आ. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, काँग्रेसने ७० हजार कोटीचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. काँग्रेस नेहमीच गोरगरीब व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहे. भाजपा सरकारमध्ये आता स्थिती याउलट आहे. भाजपा सरकारमध्ये आता स्थिती याउलट आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारे कुणी नसल्याने आता पेटून उठण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केले.प्रारंभी आयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहराव पाऊणकर यांनी महिला व शेतकरी यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मेळाव्याला जिल्ह्यातील शेतकरी व बचत गटाच्या महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची सरकारकडून उपेक्षाच
By admin | Published: October 10, 2016 12:38 AM