तळोधी बाः स्मशानभूमीच्या आवारभिंत बांधकामासाठी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. मात्र, या जागेवर दोन शेतकऱ्यांनी आपला हक्क सांगितल्याने ग्रामपंचायत प्रशासन चांगलेच अडचणी सापडले आहे.
सीमांकनानुसार आवारभिंतीचे बांधकाम होत नसल्याने गावकऱ्यांनी बांधकाम थांबवून स्मशानभूमीची जागा मोजण्याची मागणी केली. डिसेंबर महिन्यात प्रशासक व सचिवाने भूमी अभिलेख कार्यालयात पैसे भरून स्मशानभूमीची जागा मोजण्यात आली. भूमापन क्र. २४६,२४७ गटात मोजणीनुसार सीमांकन करण्यात आले. परंतु भूमापन क्र. २४७ गटामधील ३३ आर. जागेत तळोधी बा. येथील सुनील नागरे व सुधीर नागरे यांनी उन्हाळी धान रोवणी केली आहे. पिके निघाल्यानंतर जागा मोकळी करून देऊ, असे म्हणाले होते. मात्र, दिनांक २५ मे रोजी तळोधी बा.चे सरपंच, उपसरपंच, सचिव व सर्व पदाधिकारी भूमापन गट क्र. २४७ जागेवर असलेल्या ३३ आर. जागेवर सीमांकन करण्यासाठी गेले असता शेतकरी सुधीर नागरे व सुनील नागरे यांनी ३३ आर. जागा ही अधिकार अभिलेखानुसार गवती कुरण चराईची आहे. त्या जागेवर आमचा कब्जा असून, स्मशानभूमीची जागा नाही. अनेक वर्षांपासून वहिवाट करीत असल्याने जागा सोडण्यास विरोध दर्शविला. सातबाराप्रमाणे ही स्मशानभूमीची जागा आहे. या अनुषंगाने शासनासोबत पत्रव्यवहार करून सीमांकन करण्याची बाब पुढे आली. यावेळी सरपंच मदनकर, उपसरपंच राजू घिये, सचिव व्ही. के. रायपुरे, सदस्य सुधाकर कामडी, ग्रामपंचायत सदस्य डोनू पाकमोडे, सदस्य जिवेश सयाम, सदस्य सोनू नंदनवार, सदस्य विजया वाढई, सदस्या शालू ताटकर, सदस्य चचाणे, सदस्य मडावी यांची उपस्थिती होती.