चंद्रपूर : सुधारित व तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळते ही बाब हेरून अनेक शेतकऱ्यांनी आता शेतात पट्टा पद्धतीने धानाची लागवड करणे सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक पट्ट्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पट्टा पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यातील नागभिड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल, गोंडपिपरी आदी तालुक्यांमध्ये धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, विविध कीड तसेच रोगांमुळे धान उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे आता शेतकरी उत्पादन वाढून खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन रासायनिक खताची योग्यवेळी मात्रा, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी करणे तसेच मशागतीसाठी रोवणीच्या बांधीत काही विशिष्ट अंतरावर मोकळी जागा ठेवल्यास शेतीसाठी फायदेशीर ठरते. शेतकरी आधुनिक पद्धतीकडे वळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता पारंपरिक पद्धतीने धान न लावता पट्टा पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
बाॅक्स
अशी आहे पद्धत
१० ते १५ फुटांवर एक ते दीड फुटाची लांब रेषेत जागा सोडली जाते. रोपांना अधिक फुटवे फुटतात. त्यामुळे तुडतुडे व अन्य रोगावर नियंत्रण आणता येते. पिकांच्या मुळापर्यंत थेट सूर्यप्रकाश मिळत असल्याने हवा खेळती राहते. पिकाची पाहणी, विविध रोगांचे निरीक्षण करणे सोयीचे ठरते. भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्याने पूर्व-पश्चिम दिशेत पट्टा पद्धत फायदेशीर आहे.