लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केरळमध्ये गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे राज्यात येत्या चार-पाच दिवसात आगमनाचे संकेत मिळत आहेत. दरम्यान शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली. मोसमी वाऱ्यांची वाटचाल अशीच कायम राहिल्यास मान्सूनचा पाऊस जिल्ह्यातील कृषी व्यवस्थेला नवीन संजीवनी देऊ शकतो. यंदा चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर होणार खरीप लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे. शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान पुणे वेधशाळेनेही विदर्भात पुढचे चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे असल्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकºयांनी शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात चार दिवसांपासून दररोज सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. रात्रीचे तापमानही आता कमालीचे खाली घसरले. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी दिली. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने उकाडाही कमी झाला आहे.
बियाण्यांबाबत व्हॉट्स अॅपवर करता येणार तक्रारखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मान्सूनचे आगमन झाल्यास कृषी निविष्ठा खरेदीसाठी बाजारात वर्दळ वाढेल. अशावेळी विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा रकम वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तक्रारी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. कृषी निविष्ठांसाठी जादा रक्कम घेतल्यास शेतकऱ्यांनी व्हॉट्स अॅपवर व कृषी विभागाच्या ई-मेलवर पुराव्यांसह तक्रारी करता येणार आहेत.
बीटी कपाशीची नऊ लाख ८६ हजार पाकिटेजिल्ह्यात यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार आहे. यासाठी कृषी विभागाने बीटी कपाशीच्या नऊ लाख ८६ हजार पाकिटांची मागणी कृषी संचालकांकडे नोंदविली आहे.याशिवाय भात २ हजार ८०० क्विंटल, तूर २ हजार ८०० क्विंटल, सोयाबीन ३१ हजार ४४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यासाठी मागविण्यात आले. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकरी पेरणीपूर्व कामांसाठी लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे
बियाणे बाजारपेठ संशयाच्या भोवऱ्यात
बियाणे कायदा १९६६ अनुसार, कोणतेही बियाणे विकताना शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यास मनाई आहे. मात्र काही विक्रेते अशा प्रकारचे हमीपत्र भरून घेण्यास शेतकऱ्यांना तगादा लावत असल्याची माहिती. ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असणारे बियाणे विकता येत नाही. जादा नफा मिळविण्याच्या हव्यासात विक्रेते काही कंपन्यांकडून बियाणे खरेदी करतात. शेतकऱ्यांना हे बियाणे विकताना हमीपत्र भरून घेण्याचा आग्रह करीत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. पण, विशेषत: सोयाबीन बियाणे बाजारपेठ संशयाच्या भोवऱ्यात आहे. कृषी विभागाने विक्रेत्यांची चौकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आता शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. यावर्षी बियाण्यांची टंचाईदेखील होण्याची शक्यता आहे.