कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे आधारभूत केंद्र शासनाने निर्माण केले आहे. सन २०२०-२१ मधील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस रूपाने देण्याचा शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला उत्पादित शेतमाल शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केला आहे. परंतु जाहीर केलेल्या निर्णयानुसार आजपर्यंत एकाही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून चालू हंगामात बी-बियाणे, खते आणि मजुरांची मजुरी द्यायची कशी, असा प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्याचा हात देण्यासाठी शासनाने बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या बोनसची रक्कम द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, संदीप कारमवार, राकेश रत्नावार, अखिल गांगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार यांनी केली आहे.
जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना बोनस द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:20 AM