चंद्रपूर : जिल्ह्यात कृषिक्षेत्र अधिक असून यावर उपजीविका असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे येथे कृषी विभागाची जबाबदारी अधिक आहे. योग्य संशोधन केलेल्या बी-बियाण्यांसह शासनाच्या विविध योजनांचाही लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळायला हवा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी कृषी विभागाला दिले.
मतदार संघातील कृषी समस्या व कृषी विभागाच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी कृषी अधिकाऱ्यांना सदर निर्देश दिले. यावेळी कृषी अधिकारी उदय पाटील यांच्यासह विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कोणते बियाणे पेरावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. यातून अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते. यावर तोढगा काढण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे, शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेतकऱ्यांमध्ये बियाण्यांबाबत माहिती द्यावी, शेतीसह जोडधंदा करण्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनेबाबत जनजागृती करावी, बोंडअळी टाळण्यासाठी बियाण्यांचे योग्य संशोधन करावे, पात्र शेतकऱ्यांना कृषी अवजारे द्यावी, शेतकऱ्यांना पिकांकरिता सबसिडीमध्ये औषधी पुरविण्यात यावी, अशा सूचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीला मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सूर्यकांत खणके, माजी नगरसेवक बलराम डोडानी, अजय जयस्वाल आदी उपस्थित होते.