दीपक म्हैसेकर : बँक प्रतिनिधींची बैठकचंद्रपूर : ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्चपर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेमार्फत करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपले कर्ज पुनर्गठन बँकेमार्फत करुन घ्यावे. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केले. शनिवारी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, लिड बँकेचे व्यवस्थापक सुबेसिंग व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व शेतकऱ्यांना बँकामार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी घ्यावी, असे ते म्हणाले, बँकेची तक्रार येणार नाही, याबाबत खरबदारी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याचा हप्ता दोन टक्के करण्यात आला आहे. पीक विमा करणे आवश्यक असून सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बँकांनी कर्जाचे पुनर्गठनाचे काम प्राधान्याने करावे, असे ते म्हणाले. बँकांत येणारे सर्व अर्ज घेऊन ठेवावे व त्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पुनर्गठन झाले नाही किंवा कर्ज नाकारले, अशी तक्रार येता कामा नये. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी ठेवावी. बँकांनी शेतकऱ्यांना जाणिव जागृती करावी, असे त्यांनी सांगितले. तलाठ्यांचा संप असल्यामुळे कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडे सातबाराचा आग्रह न धरता कर्ज वितरीत करावे. संप संपल्यानंतर कागदाची पुर्तता बँकांनी करुन घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता नाही, अशाही शेतकऱ्यांनी पीक विमा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी बँकांमार्फत कर्ज पुनर्गठन करून घ्यावे
By admin | Published: May 01, 2016 12:35 AM