पॉझिटिव्ह स्टोरी
शेतीला व्यवसायाची जोड : युवकांनी स्वयंरोजगार करावा
प्रकाश काळे
गोवरी -
शेती बेभरवशाची झाली आहे. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. मात्र शेतीला जोड धंदा म्हणून आधार व्हावा, यासाठी राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी पुत्र निखिल गणपत लांडे ( २८) यांनी आपल्या शेतात पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करून हक्काचा स्वयंरोजगार निर्माण केला आहे.
निसर्ग साथ देत नाही, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. शेतीवर खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतीला उतरती कळा आली आहे. आपल्या घरी शेती आहे. परंतु शेतीला पूरक जोडधंदा करावा,यासाठी गोवरी येथील निखिल गणपत लांडे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतातच ‘पोल्ट्री फार्म’ व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी विविध प्रकारच्या जातीची कोंबड्यांची पिल्ले आणली असून ती पिल्ले मोठी झाल्यानंतर त्यांना यातून चांगला नफा मिळत आहे. आजघडीला त्यांच्याकडे लहानमोठी ८०० कोंबड्यांची पिल्ले आहेत. मोठ्या मेहनतीने ते पिल्लांची देखभाल करतात. पिल्लांच्या चारा-पाण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारची सिस्टिम वापरली आहे. विविध प्रकारच्या जातीची पिल्लं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या निखिल लांडे यांनी अल्पावधीतच व्यवसायाची भरभराट केली आहे. पोल्ट्री फार्म व्यवसायाचे त्यांनी केलेले नियोजन पाहण्यासाठी दूरवरून नागरिक माहिती घेण्यासाठी पोल्ट्री फार्मला भेट देत आहे. कुठेही नोकरीसाठी शोधाशोध न करता स्वतःच त्यांनी स्वयंरोजगार निर्माण करीत जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्यांचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय जोड धंदा म्हणून नक्कीच शेतीला बळ देणारा आहे. शेती बेभरवशाची झाल्याने युवकांनी शेतीला जोड धंदा म्हणून विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केल्यास स्वयंरोजगार निर्माण करता येईल. त्यामुळे युवकांनी व्यवसायाकडे वळावे असेही निखिल लांडे यांनी सांगितले.
कोट
निसर्ग साथ देत नाही. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतीला उतरती कळा आली आहे. बेरोजगारीची बिकट समस्या आजच्या युवकांसमोर उभी आहे. प्रत्येक युवकांनी स्वयंरोजगार निर्माण केल्यास बेरोजगारीची समस्या दूर होईल. सोबतच शेतीला जोड धंदा म्हणून मी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केला आहे.
-निखिल गणपत लांडे,
युवा पोल्ट्री फार्म व्यवसायिक, गोवरी.