लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : बल्लारपूर वेकोलि अंतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील कोळसा खदानीतून होणाऱ्या अवजड वाहतुकीने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णतः.काळवंडली आहे. गोवरी-पोवनी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे व ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले. मात्र, वेकोलिला त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे गोवरी येथील शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजतापासून वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरली.राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. कोळसा वाहतूक ओव्हरलोड असल्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य वाढलेले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णतः काळवंडली असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. सोबतच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ताडपत्री न झाकता वाहतूक सुरू असल्यामुळे धावत्या वाहनातून कोळशाचे तुकडे रस्त्यावर पडतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे गोवरी येथील शेतकरी प्रज्योत चिडे, बंडू मशारकर, नानाजी दरेकर, मंगेश दरेकर,रामदास देवाळकर,शुभम खवसे, करण मशारकर,लहू दरेकर, प्रफुल्ल दरेकर, रुद्राकर दरेकर, झिबला बोबडे व गावकऱ्यांनी वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरली. टँकरने रस्त्यावर पाणी मारल्यानंतर कोळसा वाहतूक पूर्ववत करण्यात आली. गोवरी-पोवनी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांना चांगल्या रस्त्याची प्रतीक्षावेकोलितून होणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक जीवघेणी आहे. अनेकदा ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याचे लेखी आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले आहे. मात्र, ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे वेकोलिच्या मुजोर प्रशासनावर अंकुश कोण लावणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.