माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक : शिवारफेरीतून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसिंदेवाही : राष्ट्रीय केमीकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही येथे दोन दिवसाचे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रविवारला करण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.पी.व्ही. शेंडे यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.सी.एफ.चे मुख्य प्रबंधक एम.के. पाचारणे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी एस.एम. बागूल उपस्थित होते. यावेळी पहिल्या सत्रामध्ये मार्गदर्शन करताना संशोधन संचालक डॉ.शेंडे यांनी अकोला कृषी विद्यापीठ अंतर्गत धान पिकाच्या विविध संशोधीत विकसीत केलेल्या वाणाची माहिती दिली. डॉ.एस.एन. लोखंडे यांनी माती परिक्षणाचे महत्त्व व फायदे, डॉ. विजय सिडाम यांनी पंतप्रधान पीक विमा योजना व इतर कृषी विषयक विविध शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेची माहिती दिली. प्रा.प्रवीण देशपांडे यांनी धान पिकातील एकात्मिक कीड नियंत्रण तर एम.के. पाचारणे यांनी रासायनातील खताचा संतुलीत वापर याविषयी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात प्रा. किरण मांडवडे यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, प्रा.स्नेहा वेलादी यांनी धान पिकातील यांत्रिकीकरण, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रेरणा धुमाळ यांनी धान प्रक्रिया व्यवसाय संबंधीत मार्गदर्शन केले. शेतकरी प्रतिनिधी सलामे यांनी आपले शेतीविषयी अनुभव व येणाऱ्या अडचणी व्यक्त केल्या.कृषी विज्ञान केंद्रातील परिक्षेत्रावर शेतकऱ्यांना मातीचे नमूने कशाप्रकारे घ्यावेत, यासाठी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना कृषी तज्ञांनी करून दाखविले तसेच परिक्षेत्रावरील पिकाचे प्रदर्शन शिवारफेरीतून दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन आर.सी.एफ.चे वरिष्ठ अधिकारी प्रमोद मांडवकर यांनी केले. तर उपस्थिताचे आभार डॉ.विजय सिडाम यांनी मानले. या दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (पालक प्रतिनिधी)
कृषी विज्ञान केंद्रातर्फे सिंदेवाही येथे शेतकरी प्रशिक्षण
By admin | Published: February 09, 2017 12:45 AM