रामनगर मार्गावर वाहतुकीची कोंडी
चंद्रपूर : शहरातील जटपुरा गेट ते रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावर काही नागरिक आपले वाहन पार्क करीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील वाहने तसेच अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.
सर्पमित्रांना साहित्य पुरवावे
चंद्रपूर : सर्पमित्रांना स्टिक, हॅण्डग्लोज, किट आदी साहित्य देण्याची मागणी सर्पमित्रांनी केली आहे. साप दिसल्यास नागरिक सर्पमित्राला बोलावतात; मात्र कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने शासनाने किमान सर्पमित्रांना साहित्य पुरवावे, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्याची दुरवस्था
भद्रावती : तालुक्यातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकाला नाहक त्रास होत आहे. मार्गावर अनेक खड्डे असल्याने संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.
निवाऱ्याची दुरुस्ती करा
गोंडपिपरी : तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवर असलेले मार्गावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या निवाऱ्यांची दुरुस्ती करून दिलासा देणे गरजेचे आहे.
समितीने लक्ष द्यावे
कोरपना : शासनावरून जनतेच्या कल्याणासाठी व गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात; परंतु योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शासनाचा मुख्य उद्देशच असफल होत असल्याचे दिसते. कोरपना तालुक्यातील बीपीएल, निराधार, अपंग, भूमिहीन, अल्पभूधारक, अनुसूचित जाती, जमातीकरिता शासनाकडून कल्याणकारी योजना गावागावात पोहोचविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर देऊन त्यांच्यावर देखरेख करणारी समितीसुद्धा नेमली जाते; परंतु सर्व यात अपयशी ठरले आहेत.
भाववाढीने नागरिक हैराण
चंद्रपूर : पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढ उच्चांक गाठत आहे. डिझेल दरवाढीची झळ मध्यमवर्गीय व जनसामान्यांना बसत आहे. याबाबत ग्रामीण भागात प्रचंड नाराजी पसरली असून, शासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.