चंद्रपूर : खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना खते, बियाण्यांच्या खरेदीसाठी गैरसोय होऊ नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये, बियाणे, खतांची मागणी केल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते कृषी निविष्ठा केंद्रामार्फत बांधावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद कृषी विभागाने हाती घेतला आहे. शेतकरीबांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, भात या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. कोरोनाच्या संक्रमण काळात शेतीच्या हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व कृषी निविष्ठांची शेतकऱ्यांना उपलब्धता व कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे व रासायनिक खते पुरवठा योजनेअंतर्गत कृषी निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी रासायनिक खते व बियाण्यांची खरेदी आपल्या गावातील शेतकरी बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी तथा कृषी विभाग यंत्रणा यांच्या संयुक्त सहकार्याने केल्यास रास्त किंमतीमध्ये उच्च गुणवत्तेचे रासायनिक खते व बियाणे तांत्रिक मार्गदर्शनासह प्राप्त होईल तसेच वाहतूक खर्चामध्ये देखील बचत होईल योसोबतच कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
बाॅक्स
यांच्यासोबत साधा संपर्क
जिल्ह्यातील शेतकरी बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधून तालुकास्तरावरील किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांची मागणी असलेले रासायनिक खत व बी-बियाणे यांचे शेतकरी गटप्रमुख यांच्यावतीने व्यवहार पूर्ण करून संबंधित गावांत पुरवठा करून घ्यावा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी बांधावर खत व बियाणे योजनेअंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करावी.