चंद्रपूर : सात-बारावर पिकांची नोंदणी तलाठ्यांकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी शेतकऱ्याला साजा कार्यालयाच्या खेटा माराव्या लागायच्या. त्यानंतरच तलाठी शेतात जायचे. त्यातही कधी कापूसऐवजी सोयाबीन, कधी धानाऐवजी गहू अशी चुकीच्या पिकांची नोंदणी करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून व्हायची. मात्र आता महसूल विभागाने डिजिटल तंत्राद्वारे नवे ई-पीक पाहणी ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्याला स्वत:च्या पिकांची नोंदणी स्वत:च करता येणार आहे. विशेष म्हणजे पिकांचा फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे ॲप शेतकऱ्यांना वापरता येणार आहे.
शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या नोंदणी्च्या आधारावरच शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पूर्वी ही नोंदणी तलाठ्यांकडून केली जायची. परंतु, ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन साजांचा प्रभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साज्याला, तर कधी त्या साज्याला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांमध्ये चुकासुद्धा व्हायच्या. परंतु, आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच शेतातील बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे. तसेच पीकांचे फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहेत.
बॉक्स
अशी करा पीक नोंदणी
ॲन्ड्राॅईड मोबाईलवरून क्यूआरकोड स्कॅन करून किंवा प्ले स्टोअरवरून पीक पाहणी ॲप डाऊनलोड करता येतो. त्यानंतर तेथे आपली वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करायची. त्यानंतर मोबाईलवर आलेला चारअंकी क्रमांक भरावा. त्यानंतर पीक पेरणीची माहिती भरावी. पिकाचा फोटो अपलोड करावा. जेवढी पिके असतील त्या सर्वांची नोंदणी करावी. जर यामध्ये अडचण येत असल्यास तलाठी किंवा कृषी सहायकांशी संपर्क करावा. नोंदणीमध्ये पीक पेरणीनंतर दोन आठवड्यात वाढलेले पीक, पिकांची पूर्ण वाढलेली अवस्था, कापणी पूर्वीची अवस्था समाविष्ट करता येणार आहे.
बॉक्स
नुकसानभरपाई व पीकविमा मिळणे सोयीचे
ॲपद्वारे शेतकरी स्वत:च्या शेतातील पिकांची नोंदणी स्वत:च करणार आहे. त्यामुळे पिकांची अचूक नोंदणी होणार आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानभरपाई आणि पीकविमा मिळणे सोपे होणार आहे.
कोट