लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घामाला व कष्टाला न्याय मिळावा, याकरिता चिमूर येथील कृषी विभागातील स्वेच्छा निवृत कर्मचारी व शेतकरी निलेश राठोड यांनी बुधवारपासून चिमूर-उमरेड रोडवरील कन्हाळगाव जवळील शेतात उपोषणाला सुरुवात केली आहे.या उपोषणाला चंद्रपूर व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणकर्ते निलेश राठोड हे कृषी विभागात काम करत असताना स्वेच्छा निवृत्ती घेऊन स्वत: ३८ एकर शेती करीत आहेत. यात ३४ एकरमध्ये ३५० क्विंटल तूर व चार एकरमध्ये शंभर क्विंटल धानाचे उत्पादन घेतात. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तूर उत्पादकांची उपेक्षा होत आहे. शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून चिमूर येथे तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, तूर खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष १ जानेवारी ते ३० मेपर्यंत तूर खरेदी करण्यात यावी, तूर विक्रीनंतर आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, तूर खरेदी पाच हजार ६७५ रुपये या हमी भावानेच खरेदी करण्यात यावी व अन्य मागण्या त्यांनी रेटून धरल्या आहेत. बुधवारी निलेश राठोड, यांच्यासोबत योगेश पाटील, राजू राठोड, प्रमोद मेंढूलकर, ब्रम्हा राठोड, प्रशांत हिंगे, नितेश राठोड, निलेश देशमुख, योगेश राठोड व अन्य शेतकरी बांधव उपोषणाला बसले होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:07 PM