पत्रकार परिषद : शेत खरेदी न करण्याची मागणी घोसरी : पाच मुले हयात असताना आणि कायदेशीर वारसदार जीवंत असताना वडिलोपार्जित शेतजमीन विक्रीस काढून वारसाना भूमिहीन करण्याचे षडयंत्र वडील करीत असल्याचा आरोप करून या प्रकरणी प्रशासनाकडे न्यायाची मागणी पत्रकार परिषदेतून नांदगाव येथील राजू गिरडकर, अजय गिरडकर व राकेश गिरडकर यांनी केली आहे. ग्रामीण पत्रकार संघाकडे नांदगाव (मूल) येथे अन्यायग्रस्तांनी आपबिती कथन केली. तिन्ही मुलांनी सांगितले की, मूल तालुक्यातील मौजा नांदगाव साज्यातील भू.क्र. ४५१/३ ही शेत जमीन तुकाराम मुरलीधर गिरडकर यांच्या नावे असून ही शेतजमीन वडिलोपार्जित असताना परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न वडिलांनी चालविला असल्याचे समजते. परंतु तुकाराम गिरडकर यांचे आम्ही राजू तुकाराम गिरडकर, अजय तुकाराम गिरडकर व राकेश तुकाराम गिरडकर हे कायदेशीर वारस आहोत. वडिलोपार्जित मालमत्तेवर वारसदार म्हणून आमचाही हक्क आहे. त्यामध्ये नवरगाव येथे राहत असलेले सावत्र भाऊ राहुल तुकाराम गिरडकर व रवी तुकाराम गिरडकर हेसुद्धा तेवढेच हक्कदार आहेत. तरीही वारसाना विश्वासात न घेता परस्पर शेती विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सदरची शेतजमिन कुणीही खरेदी करू नये व स्वत:ची फसगत केल्यास सर्वश्री जबाबदारी त्यांच्यावर राहील. विशेषत: आम्ही भावंडाना अन्य शेतजमीन नसून वडिलोपार्जित हक्काने कसून उत्पन्न घेत कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. तरीपण वडिलांनी हेकेखोरपणा करून शेतजमीन विक्री करून आम्हा वारसांना बेदखल करण्याचा कट करीत असल्याने कुणीही शेत जमीन खरेदी करू नये, असे आवाहन राजू, अजय व राकेश गिरडकर यांनी केले आहे. यावेळी गावातील गोकूल प्रभाकर चलाख व दीपक संजय गुरनुले उपस्थित होते. (वार्ताहर)
संपत्तीतून मुलांना बेदखल करण्याचे वडिलाचे षडयंत्र
By admin | Published: July 25, 2016 1:21 AM