कोरपना : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेद्वारा घेण्यात आलेल्या ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धेत कोरपना पंचायत समितीचे समावेशित तज्ज्ञ फय्याज अहेमद शेख यांचा नवोपक्रम राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट ठरला.
या स्पर्धेत चांद्यापासून बांद्यापर्यंत स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये शेख यांनी शिक्षण माझ्या शैलीचे विषयावर नवोपक्रम सादर केला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्याचा शैक्षणिक, सामाजिक विकास करणे हा होता. नवोपक्रमाची ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे मुलाखत घेण्यात आलेली होती. या सर्व बाबतीत उत्तम असे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले. त्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट म्हणून निवड झाली. हा नवोपक्रम तयार करण्यासाठी त्यांना कोरपना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विस्तार अधिकारी रवींद्र लामगे व सर्व साधन व्यक्ती, विशेष शिक्षक आदींचे सहकार्य लाभले. या निवडीबद्दल त्यांना कोरपना येथे एका समारंभात नुकतेच गौरविण्यात आले.